शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात होणा-या पहिल्या दसरा मेळाव्याला उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. शांतता क्षेत्रात मोडत असलेल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे अनिल परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना आज न्यायालयाने शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
दरम्यान, दसरा मेळावा हा ‘एमएमआरडीए’च्या वांद्रे येथील मैदानात घेण्यात यावा असे सुचवण्यात आले होते. मात्र, या मैदानानजीक कुठलेही रेल्वे स्थानक नसल्याने लोकांना तेथे येता येणार नसल्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच त्या आधारे यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्याची विनंती शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने ‘एमएमआरडीए’लाही प्रतिवादी करण्याचे निर्देश देत पालिका, पोलिसांना याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले व प्रकरणाच्या आजच्या सुनावणीमध्ये मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली.