मुंबई : दाक्षिणात्य समाज बांधवांनी मुंबईत बार सुरू करून संस्कृती भ्रष्ट केले असे वक्तव्य करणारे शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील दाक्षिणात्य समाजाची माफी मागावी, अशी मागणी तुलुनाडू शेट्टी समाजाचे यरमल हरीश शेट्टी आणि दिनेश गणेश हगडे यांनी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना समज द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत समाजमाध्यमावर ‘सिटिझन्स एक्टिव्हिझम’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातून गायकवाड यांनी जेवण मागवले होते. त्यावेळी शिळी डाळ व भात त्यांना देण्यात आला होता. संजय गायकवाड यांनी शिळे अन्न दिल्याबद्दल उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. जेवण चांगल्या दर्जाचे नसल्याची गायकवाड यांची प्रामुख्याने तक्रार होती. दरम्यान, गायकवाड यांनी दाक्षिणात्य नागरिकांनी मुंबईत बार सुरू करून संस्कृती भ्रष्ट केल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. तसेच महाराष्ट्राची संस्कृती नष्ट करण्याचे काम हे लोक करतात असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला होता. गायकवाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे दाक्षिणात्य समाजाची माफी मागावी, अशी मागणी हरीश शेट्टी आणि दिनेश गणेश हगडे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना समज द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
अदखलपात्र गुन्हा दाखल
उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कलम ११५ (२), ३५२, आणि ३(५) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या चित्रफितीच्या आधारे मरिन ड्राईव्ह पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा मुद्दा सभागृहातही गाजला होता.
समज देणारे पत्र
संजय गायकवाड यांनी अयोग्य वर्तन केल्याबद्दल त्यांना समज देणारे पत्र विधिमंडळ सचिवालयाने पाठविल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले. गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांच्यावर अन्य कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी नमूद केले.
बनियन परिधान करून विरोधकांची निदर्शने
गायकवाड यांच्याविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार निदर्शने केली होती. मारहाण करताना गायकवाड यांनी टॉवेल व बनियन परिधान केले होते. त्यामुृळे विरोधकांनी टॉवेल व बनियन परिधान करुन ‘चड्डी बनियन गॅंगचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या होत्या. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे (ठाकरे) भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे सतेज पाटील आदी त्यात सहभागी झाले होते.