अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करत एनसीबीने त्यांच्यावरील आरोप रद्द केले. गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रसृष्टीतील तारांकितांपासून ते सहकलाकारांविरोधात ‘एनसीबी’ने केलेल्या अनेक कारवाया फोल ठरल्या, त्यात आर्यन खान निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे. क्रुझवरील अमली पदार्थ पार्टी प्रकरणात पुरेशा पुराव्यांअभावी आर्यन खानसह अवीन शाहू, गोपाल जी. आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघा यांच्यावरील आरोप एनसीबीने मागे घेतले आहेत. यावरुन आता शिवसेनेचे नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं नाव घेत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेच्या वतीने शिव संपर्क अभियान सुरू करण्यात आलं आहे. शिव संपर्क अभियानासाठी खासदार हेमंत पाटील डोंबिवलीत आले होते. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमानंतर हेमंत पाटील यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

खासदार हेमंत पाटील यांनी अनेक वर्ष चर्चेत असलेल्या बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबनाथ भागातील हजारो चाकरमानी वर्षानुवर्षांपासून लोकल मधल्या जीवघेण्या गर्दीतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी कधी बुलेट ट्रेन सुरु करावीशी वाटली नाही. महाराष्ट्रातील रेल्वे मंत्री राज्यसभेवर गेले ते ही काही बोलत नाही,” असे हेमंत पाटील म्हणाले.

“महागाईविषयी कुणी बोलत नाही. सर्वसामान्यांचं जगणं अवघड झालंय. त्यावर कुणी बोलत नाही. मूळ प्रश्न बाजूला ठेवून मंदिर मशिद आणि जाती-जातीत तेढ निर्माण करणारे प्रश्न उकरून राज्यातील सरकारला बदनाम केलं जातंय. केंद्रीय तपास यंत्रणा जबरददस्तीने सरकारमधील नेत्यांना त्रास देत अटक करत आहे, हे निषेधार्ह आहे,” असेही हेमंत पाटील म्हणाले.

“शाहरुख खानच्या मुलावर जे आरोप होते, त्यातून तो निर्दोष सुटलेलाच आहे. ज्या अदानींना देशातील २८ पोर्ट दिले. त्याच्याकडे ३० हजार कोटींचं कोकेन सापडलं. त्यांना तर फाशी दिली पाहिजे होती. मात्र ते यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. जे तुमच्या विरोधात बोलतात त्याच्यावर कारवाई करतात. त्यामुळे हे देश कोणत्या दिशेला घेवून जातात हे बघा,” असं खासदार हेमंत पाटील म्हणाले.