मुंबई : निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय स्तरावर सुरू झालेल्या मतदार फेरतपासणी अर्थात स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) या उपक्रमाला शिवसेना (शिंदे) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी महापालिका निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी ही फेरतपासणी प्रक्रिया तातडीने आणि पूर्णपणे राबवली जाणं अत्यावश्यक आहे अशीही भूमिका पक्षाने घेतली आहे.
पुढील दोन वर्षात विधानसभा निवडणूक होत असलेल्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदार फेरतपासणी करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने त्याबाबत नुकतीच घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे.
तर शिवसेना (शिंदे) पक्षाने या उपक्रमाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शाह यांनी याबाबत म्हटले आहे की, हा उपक्रम Representation of the People Act, 1950 आणि 1951 अंतर्गत कायदेशीर चौकटीत राबवला जात असून, देशाच्या लोकशाही व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनविण्याचं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लोकशाही मजबूत ठेवायची असेल, तर मतदार याद्या अचूक आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे. हा राजकारणाचा विषय नाही, हा जनतेच्या अधिकाराचा विषय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील स्थलांतर, शहरीकरण आणि विभागीय बदल झाले आहेत. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये अनेक चुका, दुप्पट नावे आणि कालबाह्य नोंदी निर्माण झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी एसआयआर प्रक्रिया तातडीने आणि पूर्णपणे राबवली जावी अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकार निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांशी पूर्ण सहकार्य करेल आणि एसआयर प्रक्रियेला प्रत्येक जिल्हा, तालुका आणि प्रभाग स्तरावर वेगाने पूर्ण करेल. प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीत असावं आणि बनावट नोंदी दूर व्हाव्यात, हीच खरी लोकसेवा आणि लोकशाहीची शुचिता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, आपली माहिती तपासावी आणि लोकशाहीला अधिक सक्षम बनविण्यास हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असून ही प्रक्रिया जानेवारीच्या अखेरपर्यंत चालेल. त्यामुळे राज्याचा मतदार फेरतपासणीच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच स्पष्ट केले आहे.
