भाजपा नेत्यांकडून वारंवार मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीगाठी होत आहेत. यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देशाच्या राजकारणातून हद्दपार करा असं म्हटलं होतं, त्याच राज ठाकरेंच्या घरी भाजपा नेते वारंवार जात आहेत,” असं म्हणत मनिषा कायंदे यांनी भाजपावर निशाणा साधला. त्या सोमवारी (५ सप्टेंबर) एबीपी माझाशी बोलत होत्या.

मनिषा कायंदे म्हणाल्या, “राज ठाकरेंची भूमिका सतत बदलत आली आहे. २०१४ आणि २०१९ चीच तुलना केली तर यांच्या भूमिका परस्पर विरोधी होत्या. कधी ते मोदींचं गुणगाण गायचे, तर कधी मोदी-शाहांना देशाच्या राजकारणातून हद्दपार करा असं म्हटलंय. असं असताना भाजपाचा प्रत्येक नेता राज ठाकरेंच्या घरी का जात आहे? मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणायची ही भाजपाची एकच इर्षा उरली आहे. त्याप्रमाणे ते वागत आहेत.”

“एकच आमदार असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांकडे भाजपा वारंवार का जात आहे?”

“ज्या पक्षाकडे एकच आमदार अशा पक्षप्रमुखांकडे हे वारंवार जात आहेत. याचं कारण काय? म्हणजे यांना शेवटी कुठले तरी ठाकरे पाहिजेच. ठाकरेंशिवाय ते कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही हे स्पष्ट झालं आहे. भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात कधीही सरकार स्थापन करू शकली नाही. ही त्यांची खरी पोटदुखी आहे,” अशी टीका कायंदे यांनी केली.

“RSS ला बॅन करा म्हणणाऱ्यांशी युती”

भाजपाने महाविकासआघाडी अनैसर्गिक असल्याची वारंवार टीका केलीय. यावर बोलताना मनिषा कायंदे म्हणाल्या, “२०१४ मध्ये युती कुणी तोडली? तेव्हा भाजपानेच युती तोडली होती. हे आज नैसर्गिक युतीच्या गोष्टी करतात. भाजपा आणि पीडीपी युती करतात. ती कोणती नैसर्गिक युती आहे? जे नितीश कुमार म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) बॅन करा, त्यांच्याशी युती करतात. मायावतींशी युती करतात आणि राज्य चालवतात. धडा कोण कुणाला शिकवेल हे बघू.”

“गृहमंत्र्यांनी धडा शिकवणार अशी भाषा बोलू नये

“अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. खरंतर गृहमंत्र्यांनी धडा शिकवणार अशी भाषा बोलू नये,” असं कायंदे यांनी म्हटलं.

“भाजपाचे टार्गेट ठरले, मग ते स्वबळावर का लढत नाहीत?”

“भाजपाचे आतापर्यंत अनेक टार्गेट ठरले, पण हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना वारंवार अनेकांपुढे का जावं लागतंय? ते स्वबळावर का लढत नाही? त्यांना मनसे तरी का पाहिजे? तुम्ही बलाढ्य, महाशक्ती आहात म्हणता मग महाशक्तीला स्वतःच्या बळावर लढता येऊ नये का?” असा सवाल मनिषा कायंदे यांनी विचारला.

“मोदींनीच देशभर सर्व सणांवर निर्बंध आणले”

मंदिरांवरील निर्बंधांवरून भाजपाकडून होत असलेल्या टीकेवर मनिषा कायंदे म्हणाल्या, “सर्व देशात केंद्र सरकारने निर्बंध लावले. भाजपाचे मुख्यमंत्री असलेल्या मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर अनेक राज्यांमध्येही हेच निर्बंध होते. तेथे सर्व सार्वजनिक सणवार सुरू होते का? महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच आदेशाचं पालन करत होतो. त्यांनीच सर्व सणांवर निर्बंध आणले, मग ते हिंदूंचं सरकार नव्हतं का? ते हिंदुत्ववादी सरकार नव्हतं का?”

हेही वाचा : गृहमंत्री अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं ‘लालबागचा राजा’चं दर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही हजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदींनी देवळं बंद केली, मग ते मुघलांचं सरकार होतं का?”

“मोदींच्या आदेशाने केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशभरातील मंदिरं बंद केली होती. मग आता हा खोडसाळपणा, थिल्लरपणा का? हे म्हणतात हिंदूंचं सरकार आलं आहे, मग नरेंद्र मोदींनी देवळं बंद केली, ते काय मुघलांचं सरकार होतं का? ते काहीही बोलत आहेत. हा अत्यंत बालिशपणा आहे,” असं मत मनिषा कायंदे यांनी व्यक्त केलं.