मनसेचे टोलविरोधी आंदोलन यशस्वी झाल्याचे स्वत: राज ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी आंदोलन खरंच यशस्वी झाले का याबाबत चर्चा थांबताना दिसत नाही. अनेकांनी हे आंदोलन फक्त राजकीय फायदा उठवण्यासाठीच केले असल्याचा दावा केला आहे. सत्ताधा-यांनी राज यांच्या आंदोलनावर मौन बाळगले असले तरी महायुतीमधील नेत्यांनी राज ठाकरेंचे आंदोलन हा फुसका बार असल्याचे म्हटले आहे. मनसेचा कट्टर विरोधक पक्ष शिवसेनेने आज (शुक्रवार) याबाबत रोखठोक भूमिका घेत राज ठाकरेंना ‘नया है वह!’ म्हणत, त्यांची आणि त्यांच्या आदोलनाची जाहीर खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखात सेनेने म्हटले आहे की, ‘टाईमपास’नामक मराठी सिनेमातील ‘नया है वह’ हा डायलॉग सध्या तरुण पिढीत गाजतो आहे. ‘मनसे’चे टोलविरोधी आंदोलन, रास्ता रोको वगैरे प्रकार ज्याप्रकारे कोसळला त्यावरही ‘नया है वह’ अशीच गमतीशीर प्रतिक्रिया लोकांत उमटत आहे. आम्ही पामर यावर काय बोलणार? लोकच काय ते बोलत आहेत. लोकशाहीत ज्याप्रमाणे प्रत्येकाला मोर्चे, आंदोलने वगैरे करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे तसे लोकांनाही अभिव्यक्ती नामक स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे लोक बोलणारच. लोकांची तोंडे कशी बंद करता येणार?
शिवसेनेने सोशल मिडियावर फिरणा-या ‘नया है वह!’ या मेसेजचा अगदी चपखल वापर करून राज ठाकरेंवर टीका केली असताना, आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
शिवसेनेची ‘राज’वर मार्मिक टिपण्णी – ‘नया है वह!’
मनसेचा कट्टर विरोधक पक्ष शिवसेनेने आज (शुक्रवार) याबाबत रोखठोक भूमिका घेत राज ठाकरेंना 'नया है वह!' म्हणत, त्यांची आणि त्यांच्या आदोलनाची जाहीर खिल्ली उडवली आहे.
First published on: 14-02-2014 at 11:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena target mns says naya hai vaha