मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चित्रभाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणाऱ्या ज्येष्ठ चित्रकर्मी सुधीर पटवर्धन यांच्या कला जीवनावर आधारित विशेष लघुपट रसिक प्रेक्षकांना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या एक खास कार्यक्रमातून पाहता येणार आहे. लघुपटकार हर्षिल भानुशाली यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटातून सुधीर पटवर्धन यांच्या कला जीवनातील विविध पैलू उलगडणार आहेत.

चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात एक्स्प्रेशनिस्ट म्हणून केली. पुढे शहरे आणि त्यांची वाढ आणि त्यातील लोक हाच त्यांच्या चित्राचा विषय ठरू लागला आणि त्यात शहरातील कष्टकरी वर्ग, मध्यमवर्ग यांच्या जगण्याचे विविध रंग त्यांच्या चित्रात येऊ लागले. त्यांच्या कला जीवनाचा मागोवा घेणारा लघुपट प्रेक्षकांना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या विशेष कार्यक्रमातून पाहता येणार आहे.

मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. येत्या ३० ऑक्टोबरपासून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, पार्ल्यातील लोकमान्य सेवासंघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात साहित्य, कलासंस्कृतीचा नव्या जाणीवनेणिवेतून वेध घेत सादर होणारे विशेष प्रयोग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

याच विशेष कार्यक्रमांचा भाग म्हणून मानवी जगण्याकडे आतून-बाहेरून बघणाऱ्या आणि स्वतःसह सर्वांकडे पाहण्याची सम्यक दृष्टी चित्रातून येते का याचा शोध घेणाऱ्या सुधीर पटवर्धन यांच्या कला जीवनावरील हा नवा लघुपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. लघुपट दिग्दर्शक हर्षिल भानुशाली यांचा नवा लघुपट हा पटवर्धन यांच्या समग्र वाटचालीकडे दृश्यांतून अधिक पाहणारा असा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

यामुळे पटवर्धन यांचा प्रवास, चित्रे तसेच कलेतून बाह्य जगताकडे पाहता पाहता अंतर्मुख होत स्वतःकडेही चित्रातून पाहण्याची त्यांची दृष्टी अशा विविध पैलूंचा वेध या लघुपटातून घेतला आहे. यातून या अवलिया कलाकाराच्या अंतरंगाचे एक भव्य चित्रच जणू लघुपटातून भानुशाली यांनी उलगडले आहे. या अशा विशेष कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, काही विशेष प्रयोगांसह कला-साहित्य-संस्कृतीचा मौलिक खजिना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ मध्ये अनुभवता येणार आहे.