मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून फाइल्स तपासल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने सोमय्या यांच्याकडून खुलासा मागविला असून नगरविकास विभागातील तीन अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनाधिकृत बांधकामास पालिकेने लावलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत सोमय्या यांनी माहिती अधिकारात नगरविकास विभागाकडे या निर्णयासंदर्भातील माहिती मागविली होती. त्यानुसार  नगरविकास विभागाने सोमय्या यांना सोमवारी १.२० वाजता फाइल अवलोकनासाठी बोलाविले होते. सोमय्या यांनी नगर विकास विभागातील कक्ष क्रमांक ११६ मध्ये जाऊन काही फाइल्स तपासल्या. त्या वेळी ते शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून या फाइल्स बघत होते. त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरल्यावर वादाला तोंड फुटले आहे. सोमय्या यांनी कोणत्या फाइल्स कोणत्या अधिकारात तपासल्या, माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता का, शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत ते का बसले होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

 सोमय्या यांनी अधिकऱ्यांच्या खूर्चीत बसून फाइल चाळणे आणि त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याप्रकरणी  एक कक्ष अधिकारी आणि दोन नगरनियोजन अधिकारी अशा तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  त्याचप्रमाणे  सरकारने सोमय्या यांनाही नोटीस बजावली असून कार्यालयात फाइलीचे अवलोकन करीत असताना अधिकाऱ्यांची छायाचित्रे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणे ही कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून अनुचित असल्याने, सदर कृतीबद्दल दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश सोमय्या यांना देण्यात आले असून तसे पत्रही पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

फडणवीस यांची टीका 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहिती अधिकारात फाइलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणाऱ्यालाच नोटीस. या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.