संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम येथे १९३४ मध्ये रुग्णसेवेसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री हितवर्धक मंड‌‌ळाने रुग्णसेवेच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना रुग्णसेवेचा विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. आगामी वर्षात हृदरुग्णांसाठी कॅथलॅब तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु करण्यात येणार आहेत. तब्बल पन्नास खाटांची वाढ व मॉड्युलर शस्त्रक्रियागृह गोरगरीब रुग्णांसाठी आगामी वर्षात कार्यरत होणार आहे.

कांदिवली पश्चिम येथे रेल्वे स्थानकापासून पाच मनिटांच्या अंतरावर असलेले श्री हितवर्धक मंडळ हे पश्चिम उपनगरातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी जीवनदायी मानले जाते. नव्वद वर्षांपूर्वी काही गुर्जर बांधवांनी रुग्णसेवेच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदिक दवाखाना सुरु केला होता. यातूनच पुढे रुग्णालयाची तीन मजली इमारत उभी राहिली. ऐंशीच्या दशकात या रुग्णालयात नेत्रविभाग सुरु करण्यात येऊन मोतिबिंदू शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली. रुग्णालय व्यवस्थापनाचा रुग्णविषयक सेवाभाव पाहून उपनगरातील बहुतेक सर्व मोठ्या डॉक्टरांनी नाममात्र शुल्क आकारून रुग्णालयासाठी काम करण्यास सुरुवात केली. यातूनच पुढे किडनी रुग्णांसाठी डायलिलीस सेवा सुरु करण्यात आली. डॉ. उमेश खन्ना व डॉ. अतुल पारेख हे या व्यवस्थेचा आधारस्तंभ बनले. वर्षाकाठी या रुग्णालयात जवळपास १५ हजार रुग्णांवर डायलिसिसचे उपचार होतात. अन्य खाजगी रुग्णालयात एका डायलिसीससाठी दीड ते दोन हजार रुपये रुग्णाला मोजावे लागत असताना हितवर्धक मंडळात साडेआठशे रुपयांमध्ये डायलिसीस केले जाते. त्यातही ज्या रुग्णांना हा खर्च परवडत नाही त्यांच्यासाठी रुग्णालयाकडून आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्ती उभ्या केल्या जातात. त्यामुळे बहुतेक प्रकरणात रुग्णाला विनामूल्य किंवा तीनशे-साडेतीनशे रुपयांमध्ये डायलिसीस सेवा उपलब्ध होते.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निता सिंगी यांना नव्वद वर्षांच्या वाटचालीविषयी विचारले असता, रुग्णालयाच्या विश्वस्तांना गेल्या अनेक वर्षांत रुग्णसेवेचा पाया भक्कम करत नेल्याचे त्यांनी सांगितले. आजघडीला बाह्यरुग्ण विभागात वर्षाकाठी अडीच लाख रुग्णांवर उपचार केले जातात. जवळपास पाच हजार शस्त्रक्रिया अत्यल्प दरात वर्षाकाठी होतात. यात डोळ्याच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण तीन हजार एवढे असून यात प्रामुख्याने मोतिबिंदुच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण जास्त आहे. गेल्या काही वर्षात हितवर्धक मंडळात कर्करुग्णांवर मोठ्या प्रामणात उपचार सुरु करण्यात आले आहेत. केमोथेरपी तसेच कर्करुग्णांच्या शस्त्रक्रिया आम्ही करतो. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार संस्थेबाहेरील एका केंद्राच्या मदतीने रेडिएशन उपचारही केले जातात असे त्यांनी सांगितले. एकाकी वद्ध तसेच ज्या वृद्धांना पॅलेटिव्ह केअरची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी गेल्या वर्षापासून आम्ही पॅलेटिव्ह केअर सेवा सुरु केली आहे. डॉ. स्मृती खन्ना या सेवेच्या प्रमुख असून आवश्यकतेनुसार रुग्णांच्या घरी जाऊन आमचे डॉक्टर व अन्य कर्मचारी रुग्णांना सेवा देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हितवर्धक मंडळाचे प्रमुख विश्वस्त सतीश दत्तानी, रजनी गेलानी, बिजल दत्तानी तसेच पंकज शहा यांनी संस्थेला नव्वद वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४८ खाटांचे रुग्णालय आगामी वर्षात १०० खाटांचे होणार आहे. तसेच रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर मॉड्युलर शस्त्रक्रियागृह येत्या एक जून रोजी सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय नोव्हेंबरपर्यंत हृदयविकारावरील उपचारांसाठी अत्याधुनिक कॅथलॅब व किडनी ट्रान्सप्लांट सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. नीता सिंगी यांनी सांगितले. आमच्याकडे रुग्णांकडून बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांच्या तपासणीसाठी २० रुपये ते २०० रुपये फी आकारण्यात येते.मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी आमच्याकेडे पंधराशे रुपये आकारले जातात. अर्थात विदेशी लेन्स बसवायची असल्यास लेन्सच्या किमतीनुसार जास्तीतजास्त ३२ हजार रुपये आकारले जातात. खाजगी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रतक्रियेसाठी किमान लाखभर रुपये लागतात. जवळपास शंभरहून अधिक सुपर स्पेशालिस्ट आमच्या रुग्णालयाशी जोडलेले असून त्याचा मोठा फायदा येथे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना होतो, असे विश्वस्त बिजल दत्तानी यांनी सांगितले. आगामी काळात रुग्णसेवेचा विस्तार करताना ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन आरोग्य शिबीरे घेण्याचा आमचा मानस आहे. मानसिक आजाराचे वाढते रुग्ण तसेच एकाकी वृद्धांचा विचार करून आगामी काळात काही ठोस काम करण्याचा विचार असल्याचे बिजल दत्तानी यांनी सांगितले.