देशभरात आतापासूनच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. बहुतांश पक्षांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आपापसांत जागावाटप नेमकं कसं करावं यासंदर्भात बैठका आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी भाजपा-शिंदे गटामध्येही असाच काहीसा प्रकार घडताना दिसून येत आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात चक्क मुख्यमंत्र्यांच्याच मुलाच्या उमेदवारीवरून खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे. कल्याणमध्ये भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपानं घेतली आहे. “कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणता उमेदवार सहन केला जाणार नाही”, अशी भूमिका भाजपाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी (०८ जून) घेण्यात आली आहे. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, मी हे वाक्य ऐकलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. मला वाटतं कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल. जो उमेदवार योग्य असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. भाजपा-शिवसेनेची युती झाली ती वेगळ्या विचारांवर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विचाराने ही युती केली आणि मग सरकार स्थापन केलं.

श्रीकांत शिंदे म्हणाले, आपल्या राज्यातलं सरकार चांगलं काम करत आहे. परंतु कुठल्या तरी एका क्षुल्लक कारणावरून, कुठल्या तरी वरिष्ट पोलीस निरिक्षकावर कारवाई होत नाही तोवर हे ठराव करतात की, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही. त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्ही ठरवू असंही म्हणतात. ही आव्हानं त्यांनी विचारपूर्वक केली पाहिजेत. आम्हाला आव्हान देण्याचं काम या लोकांनी करू नये. कारण या ठिकाणी शिंदे साहेबांनी १० महिन्यांपूर्वी जे केलं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात केलं. याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी ते पाऊल उचललं नसतं तर काय परिणाम झाले असते याचा विचार त्यांनी केला पाहिजे.

शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेतील मतदारांनी मला बहुमताने निवडून दिलं आहे. सगळं काम चांगलं सुरू असताना कोणीही क्षुल्लक कारणावरून युतीमुध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान होतील यासाठी काम केलं पाहिजे.

हे ही वाचा >> “औरंगजेब याच मातीतला”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर, म्हणाले…

…तर उद्या राजीनामा देईन : श्रीकांत शिंदे

खासदार श्रीकांत शिंदे म्हमाले, मला जर सांगितलं कल्याण लोकसभेचा (खासदारकीचा) राजीनामा द्या, तर मी उद्या राजीनामा द्यायला तयार आहे. पूर्णवेळ पक्षाचं काम आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. जर उद्या मला पक्ष नेतृत्वाने सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं, हवं तर तुम्ही सांगा तुम्हाला त्या ठिकाणी कल्याण लोकसभेसाठीचांगला उमेदवार मिळतोय, तर त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल तसा मी ही काम करायला तयार आहे. आमचा उद्देश एकच आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. आमचा हेतू इतका शुद्ध आहे. आमचा कुठलाही स्वार्थ नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrikant shinde says will resign anytime on bjp opposes kalyan loksabha candidature asc
First published on: 09-06-2023 at 21:51 IST