संदीप आचार्य, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यात सिकलसेलच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून आगामी वर्षांत ज्या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण प्रामुख्याने आढळून येतात त्या जिल्ह्यात व्यापक शोधमोहीम राबविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

सिकलसेल आजार हा आनुवंशिक व गंभीर स्वरूपाचा असून आई आणि वडील दोघेही सिकलसेल रुग्ण किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. हा आजार लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनचा आजार आहे. या आजारामधील लाल रक्तपेशी तुलनेने घट्ट व चिकट असतात. त्या रक्तवाहिन्यांमधून सहज वाहून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अवयवांच्या रक्त पुरवठयामध्ये अडथळा निर्माण होतो आणि अवयवांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही. अशा रुग्णांच्या अवयवास इजा होण्याची वा त्या निकामी होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अशा रुग्णांना सांधेदुखी, जंतुसंसर्ग होतो. हा आजार आदिवासी समाजांमध्ये इतर समाजाच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात आढळून येत असून यात सिकलसेलग्रस्त व वाहक आदी प्रकार आहेत.

आरोग्य विभागाकडून प्रामुख्याने राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये या आजारासाठी नियमित चाचण्या करण्यात येतात. यात सोल्युबिलिटी चाचणीत सिकलसेल रुग्ण असल्याचे निश्चित होत असून २०२०-२१ मध्ये राज्यातील २१ जिल्ह्यांत सुमारे ७,६५,१४१ चाचण्या करण्यात आल्या. यात ३४४ रुग्ण तर ६१०५ वाहक आढळून आले. या तुलनेत २०२२ जानेवारीअखेपर्यंत आरोग्य विभागात आठ लाख ५७० सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या असून यात ७३३ रुग्ण आढळून आले तर ८१५८ हे सिकलसेल वाहक असल्याचे दिसून आले. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, धुळे, अकोला, जळगाव तसेच अमरावती येथे मोठय़ा प्रमाणात वाहक आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार करोनापूर्वी सिकलसेल आजाराचे रुग्ण शोधून काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात चाचण्या केल्या जायच्या. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये ३७ लाख १५ हजार ४७० चाचण्या करण्यात आल्या. त्यात १९१६ रुग्ण आढळून आले तर २५ हजार ६९५ वाहक असल्याचे दिसून आले. परिणामी आगामी वर्षांत आम्ही मोठय़ा प्रमाणात सिकलसेल रुग्णांची शोधमोहीम हाती घेणार असल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sickle cell patients increase in maharashtra state zws
First published on: 13-09-2022 at 02:37 IST