मुंबई : राज्यातील आर्ट आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अॅण्ड डिझाईन’कडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. संस्थेच्या कॉम्युनिकेशन अॅण्ड एक्सपीरियन्स डिझाईन, टायपोग्राफी आणि डिझाईन एज्युकेशन या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणताही पदवीधर विद्यार्थी पात्र आहे. तसेच मेट्रोपोलिटन आर्किटेक्चर आणि आर्किटेक्चर एज्युकेशन या कोर्सेससाठी आर्किटेक्चर पदवी असणे आवश्यक आहे.
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कॉन्टेम्पररी आर्ट प्रॅक्टिस आणि आर्ट एज्युकेशन यांसारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यासाठी बी.एफ.ए., बी.डीझ., बी.आर्क., बी.बी.ए., मीडिया मॅनेजमेंट किंवा इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
चित्रकला व शिल्पकलेतील विशेष अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू असून, यात पेंटिंग, पोर्ट्रेटर, म्युरल, ग्राफिक, स्कल्पचर, सेरामिक, टेक्स्टाइल डिझाईन, इंटेरियर डिझाईन आणि मेटल वर्क यांचा समावेश आहे. यासाठी संबंधित विषयात बी.एफ.ए., बी.व्ही.ए. ही पदवी आवश्यक आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा आहेत. मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (एम.एफ.ए.) पेंटिंग, पोर्ट्रेटर, म्युरल इत्यादी कोर्सेससाठी प्रत्येकी ५ जागा आहेत. तर, मास्टर ऑफ डिझाईन (एम.डिझाईन) आणि मास्टर ऑफ आर्किटेक्चर (एम.आर्क.) कोर्सेससाठी अनुक्रमे ९ आणि ८ जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी http://www.sirjjuniv.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. जागा कमी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत ऑनलाइन सादर करावे, मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे संस्थेचे प्रभारी कुलसचिव शशिकांत काकडे यांनी स्पष्ट केले.