टुरिस्ट व्हिसावर थायलंडचा बोर्डिंग पास मिळवून मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. सहाही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा- सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या महिलेस अटक; वाहतूक हवालदाराला शिवीगाळ करून वाद घातल्याचा आरोप
गुरविंदर कपूर सिंह, सलामतवीर कवालप्रीत सिंह, भूपिंदर हरमन सिंह, सुखविंदर मानसिंह, अरुणप्रीत जगजीत सिंह, संदीप राजिंदर सिंह अशी या प्रवाशांची नावे असून ते सर्वजण पंजाबच्या अमृतसरमधील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी गुरविंदरसह इतर पाचजण टुरिस्ट व्हिसावर थायलंडला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांच्याकडे टुरिस्ट व्हिसा होता, आपण थायलंडला फिरायला जात आहोत, असे त्यांनी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगून प्रवासाचे बोर्डिंग पास मिळविले, इमिग्रेशनची प्रक्रियाही पूर्ण केली.
हेही वाचा- महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करणार ‘पॅलेटिव्ह केअर’!
त्यानंतर त्यांनी थायलंडचे बोर्डिंग पास नष्ट करुन लंडनला जाणाऱ्या विमानाचे बोर्डिंग पास मिळविण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्यांनी मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानाने प्रवास करण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या सहाही प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. थायलंडचे बोर्डिंग पास नष्ट करून लंडनचे बोर्डिंग पास मिळवून फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी संदीप नामदेव डगळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या सहा प्रवाशांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचे पारपत्र, बोर्डिंग पाससह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.