पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून सुटणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीची साखळी खेचल्याने ही गाडी अप आणि डाउन जलद या मार्गावर अडकली. परिणामी गाडय़ा २०-२५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, एकाच रेल्वेमार्गावर दोन विरुद्ध दिशेला जाणाऱ्या गाडय़ा समोरासमोर आल्याच्या अफवेनेही जोर पकडला होता.
दादर स्थानकातून अजमेर एक्सप्रेस अप जलद मार्ग ओलांडून डाउन जलद मार्गावर येत असताना गाडीतील एका प्रवाशाला छातीत दुखू लागल्याने प्रवाशांनी साखळी खेचली. त्यामुळे ही गाडी दोन्ही मार्ग अडकवून थांबली. परिणामी या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र पुढील दहा मिनिटांत ही गाडी पुढे रवाना झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली.
मुंबईत दोन हत्या
मुंबई : मुंबईत लागोपाठ दोन दिवसात दोन हत्या उघडकीस आल्या आहेत. वडाळा येथे जितेंद्र चौहान याची रविवारी हत्या करण्यात आली होती. पाठोपाठ सोमवारी मालाड येथे रोहितसिंह (२२) या बांधकाम मुजराची हत्या झाली.मालाडच्या कुरार भागात काम करणारा रोहित बेपत्ता होता. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आढळून आला. त्याच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ जखमा झालेल्या आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठीभगवती रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे. रविवारी वडाळा येथे जितेंद्र चौहान (३६) या मजुराचा मृतदेह आढळला होता. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी या हत्येप्रकरणी असलम खान या इसमाला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र चौहान फरार आहे.
दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
मुंबई : जोगेश्वरीतून दोन बांगलादेशी नागरिकांसह तिघांना ओशिवरा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. बनावट पारपत्राच्या आधारे ते परदेशात जाण्याच्या तयारीत होते.
दोन बांगलादेशी नागरिक जोगेश्वरीच्या बेहरामबाग येथे रहात असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी एका हॉटेलात छापा घालून या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बनावट भारतीय पारपत्र आढळून आले. त्या पारपत्राच्या आधारे ते परदेशी जाण्याच्या तयारीत होते. सीमेवरून गस्ती पथकाची नजर चुकवून ते भारतात आले होते. दोघे पाच महिन्यांपासून जोगेश्वरीत रहात होते. त्यांना बनावट पारपत्र बनवून देणाऱ्या एजंटलाही अटक झाली आहे.
आसनगावजवळ साकेत एक्स्प्रेस घसरली
शहापूर : भाऊबीजेच्या दिवशी आसनगाव-आटगाव स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बिघाडाची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी आसनगाव-वासींद स्थानकादरम्यान साकेत एक्स्प्रेसची चाके रुळावर जागेवरच फिरत होती. त्यामुळे एक्स्प्रेसची गती मंदावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईहून नाशिककडे जाणारी साकेत एक्स्प्रेस आसनगाव-वासिंद स्थानकादरम्यान येताच तिचा वेग कमालीचा मंदावला. एक्स्प्रेसची चाके रुळावर जागच्याजागी फिरत होती. त्यामुळे सुमारे एक तास उशीराने लोकल धावत होत्या. परिणामी, मध्य रेल्वेच्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
ठाण्यात उद्या पाणी नाही
ठाणे : ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर जलकुंभावरील मुख्य जलवाहिनीवर मीटर बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत कोलबाड, खोपट, गोकुळनगर, चरई, धोबी आळी, एदलजी रोड, आंबेडकर रोड (डावी बाजू), विकास कॉम्प्लेक्स, एलबीएस रोड, चंदनवाडी, सिध्देश्वर तलाव परिसर, हंसनगर इ. परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2014 रोजी प्रकाशित
साखळी खेचल्याने पश्चिम रेल्वे खोळंबली
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून सुटणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीची साखळी खेचल्याने ही गाडी अप आणि डाउन जलद या मार्गावर अडकली.
First published on: 28-10-2014 at 03:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small news from mumbai and thane