वेळखाऊ व्यवहारांमुळे ‘डिजिटल वॉलेट’कडे छोटय़ा व्यावसायिकांची पाठ
निश्चलनीकरणानंतर निर्माण झालेल्या गोंधळावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने ‘डिजिटल वॉलेट’ किंवा रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली असली तरी, अशा व्यवहारांची ‘नवलाई’ आता कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर भाजीवाल्यापासून रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत अनेक छोटय़ा व्यावसायिकांनी पेटीएम, फ्रीचार्ज यांसारख्या ‘डिजिटल वॉलेट’वरून व्यवहार करण्यास सुरुवात केली. परंतु या व्यवहारांसाठी लागणारा वेळ, रकमेवर लागणारा अधिभार तसेच वेगवेगळ्या अॅपचा भडिमार यामुळे कंटाळलेल्या विक्रेत्यांनी आता ही ‘कॅशलेस’ सुविधा गुंडाळून ठेवली आहे.
पाचशे-हजाराच्या नोटाबंदीनंतर नव्या नोटांचा तुटवडा, जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँका-एटीएममध्ये हेलपाटा घालण्यासाठी सुरू झालेला त्रास अशा चलनकल्लोळावर ‘कॅशलेस’ व्यवहाराचे पिल्लू केंद्र सरकारने बाहेर काढले. अगदी पहिल्याच दिवसापासून म्हणजे ८ नोव्हेंबरपासून पानभर जाहिराती छापून पेटीएम, फ्री चार्जसारख्या कंपन्यांनी रोख व्यवहारांना आपल्याकडे कसा ‘कॅशलेस’ पर्याय आहे, याच्या जाहिराती करण्यास सुरुवात केली. सरकारनेही अशा व्यवहारांना प्राधान्य देऊ केल्याने अनेक छोटय़ा-मोठय़ा दुकानदारांनी असे मोबाइल अॅप डाऊनलोड करून ग्राहकांना सुविधा देण्यास सुरुवात केली. परंतु जवळपास १५-२० दिवसांतच या व्यवहारांतील कटकटी समोर येऊ लागल्या आहेत.
नरिमन पॉइंट येथे नीलेश गुप्ता यांची पानटपरी आहे. ते म्हणतात, ‘साधारण दहा दिवसांपूर्वी मी पेटीएमद्वारे व्यवहार सुरू केला, पण याचा फटका बसू लागला आहे. प्रत्येक ‘पेटीएम’ ग्राहकासाठी वेळ द्यावा लागतो. अनेकदा बारकोड स्कॅन होत नाही. त्या वेळी मोबाइल नंबर सांगावा लागतो. अशा वेळी पान तयार करू की ‘पेटीएम’ करू?’ दुकानावर दिवसाला १००-२०० ग्राहक येत असतात. सर्वाचे व्यवहार पेटीएमवरून करणे शक्य नाही. माझ्या विश्रांतीच्या वेळी व्यवहार सांभाळणारे आपले वडील मोबाइल हाताळू शकत नाहीत, याकडेही गुप्ता यांनी लक्ष वेधले.
गेल्या काही दिवसांपासून बिलासाठी वारंवार ‘स्कॅन’ करावे लागणे, वेळेवर ‘स्कॅिनग’ न होणे, नेटवर्क उपलब्ध नसणे, अशा अनेक कारणांमुळे र्मचट पेटीएम वापरणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. मरिन लाइन्स परिसरातील मोबाइल शॉपीचे मालक सूरज म्हणाले, ‘र्मचट पेटीएम देणारा प्रतिनिधी आता बोलावले तरी येत नाही. आम्हाला काही अडचण आली तर कोणाला विचारायचे हे माहीत नाही. त्यामुळे रोजचा ताण घेण्यापेक्षा मी पेटीएम बंद केले आहे.’
कैलास मंदिर या चाट सेंटरचे चालक राजेश यांनाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. ‘मी फार शिकलेलो नाही. त्यात प्रत्येक वेळी मोबाइलवर पैशांचा व्यवहार करायला भीतीही वाटते आणि ग्राहकांच्या गर्दीत जमतही नाही. मोठय़ा दुकानांमध्ये हे जमू शकते. आमच्याकडे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येतात. त्यामुळे पेटीएमने व्यवहार करणे शक्य होत नाही,’ असे राजेश म्हणाले. बदलापूर पूर्वेला किरणा मालाचे दुकान चालविणारे विवेक धोत्रे यांनाही पेटीएमच्या व्यवहारात अडचणी येत आहेत. ‘पेटीएममधील रक्कम बँकेत भरण्यासाठी ३.३ टक्के कर घेतला जातो. यामध्ये नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आमच्या दुकानात १ हजार रुपयांवरील खरेदीवर पेटीएम पैसे घेत नाही,’ असे धोत्रे यांनी सांगितले.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये आकाश भोसले यांचे भाजीचे दुकान आहे. नोटाबंदीनंतर त्यांनी पेटीएम सुरू केले. मात्र दर वेळी मोबाइल काढून व्यवहार करणे कठीण जाते. पेटीएम सुरू केले असले तरी ते नकोसे झाले आहे, असे ते म्हणाले.
‘डिजिटल वॉलेट’ गैरसोयीचे का?
* बारकोड, क्यूआरकोड व्यवस्थित स्कॅन होत नाही.
* प्रत्येक वेळी ग्राहकाला मोबाइल नंबर द्यावा लागतो. तो चुकण्याची भीती असते.
* या संपूर्ण प्रक्रियेत वेळ जात असल्याने अन्य ग्राहक ताटकळतात किंवा अन्यत्र निघून जातात.
* ‘पेटीएम’मधील रक्कम बँकेत जमा होताना अधिभार लागत असल्याची तक्रार.
* रोजच्यारोज घाऊक विक्रेत्यांसोबत रोखीने व्यवहार करावे लागतात.
पेटीएममधून हे पैसे बँकेच्या खात्यावर जमा होतात. मात्र ते काढण्यासाठी एटीएम आणि बँकांच्याबाहेर तासन्तास रांगेत उभे राहावेच लागते. त्यापेक्षा रोख व्यवहार केला तर दुसऱ्या दिवशी माल आणण्यासाठी मला तातडीने रोख देता येते. त्यामुळे मी सुरू केलेला पेटीएम व्यवहार बंद केला.
– जिग्नेश अग्रवाल, स्टेशनरी विक्रेते, मरिन लाइन्स