मुंबई : साकिनाका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांच्या प्रकरणात चक्रावून टाकणारी माहिती समोर येत आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी ‘फोटो कोड’चा वापर करीत होते. कर्नाटकमधून सार्वजनिक बसमधून मुंबईत अमली पदार्थ आणले जात होते. अमली पदार्थ वितरण कऱणारी आणि ते घेणारी व्यक्ती एकमेकांना आपल्या शर्टाचे छायाचित्र पाठवायचे. त्यावरून खात्री पटवून ते अमली पदार्थांची देवाण-घेवाण करीत होते. या प्रकरणात पोलिसांनी ३ महिन्यात ४३४ कोटींचे एमडी जप्त केले.
एप्रिल महिन्यात साकिनाका पोलिसांनी वसई (पूर्व) येथील कामण परिसरातून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ४ किलो ५३ ग्रॅम वजनाचे ८ कोटी रुपयांचे एमडी (मॅफेड्रॉन) जप्त करण्यात आले होते. तेव्हापासून पोलीस अमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढत आहेत.
या प्रकरणातील फरार आरोपी सलीम शेख उर्फ सलीम लंगडा (४५) याला विशेष पथकाने वांद्रे रेक्लेमेशन येथून अटक केली होती. कर्नाटकच्या म्हैसूर येथून एमडी आणत असल्याची माहिती आरोपी सलीमने पोलिसांना दिली. त्यानुसार म्हैसूर शहरातील रिंगरोडवरील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये एमडी अमली पदार्थांचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून ३८१ कोटी रुपये किंमतीचे १८७ किलो एमडी जप्त करण्यात आले होते.
असा होता ‘फोटो कोड’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थाच्या व्यवहारात आरोपींचे दोन गट काम करीत होते. एक गट अमली पदार्थ तयार करून वितरण करायचा, तर दुसरा गट अमली पदार्थांची विक्री करायचा. अमली पदार्थांचे वितरण करण्याचे काम अत्यंत गोपनीय पध्दतीने चालत होते. अमली पदार्थांचे वितरण करणारे बंगळूर येथून बसने मुंबईत जायचे. अमली पदार्थांचे वितरण करणाऱ्यांना ‘कुरियर’, तर ते ताब्यात घेणाऱ्यांना ‘रिसिव्हर’ म्हणतात. ते एकमेकांना ओळखत नाहीत.
ते एकमेकांना व्हॉटस ॲपवर आपल्या शर्टाचे छायाचित्र पाठवायचे. ‘कुरियर’ मग बंगळूरू येथून बसने मुंबईत विशिष्ट ठिकाणी यायचा. तेथे अमली पदार्थ ताब्यात घेणारा ‘रिसिव्हर’ आधीच येऊन थांबलेला असायचा. व्हॉटस ॲपवर पाठवलेल्या त्या विशिष्ट रंगाचे शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीची खात्री केल्यानंतर अमली पदार्थांची देवाण – घेवाण करण्यात येत होती. ते चुकूनही एकमेकांशी फोनवर बोलायचे नाहीत. कुख्यात विष्णोई टोळी शस्त्रांस्त्रांची देवाण करण्यासाठी अशा प्रकारची पध्दत वापरत होते.
कर्नाटकमध्ये कारखाना, बसमधून वितरण
याप्रकरणाचा आता एमआयडीसी पोलिसांबरोबरच आयबी (गुप्तवार्ता विभाग) देखील तपास करीत आहे. आयबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी या प्रकरणातील अटक आरोपींची चौकशी करून या टोळीच्या कार्यपध्दतीची माहिती घेतली. कर्नाटकमधील म्हैसूर येथे एमडी (मॅफेड्रॉन) बनविण्याचा कारखाना होता. तेथून ‘कुरियर’ रस्ते मार्गाने मुंबई आणि देशाच्या अन्य शहरात अमली पदार्थ विकत होते. या टोळीचा दुसरा गट अमली पदार्थ ताब्यात घेऊन त्याची विक्री करीत होता. आरोपी शक्यतो सार्वजनिक बसचा वापर करीत होते. त्यामुळे कुणाला संशय येत नव्हता. तपासणीमधूनही ते सहज सुटत होते. मोबाइलच्या आधारे पोलीस माग काढतात. त्यामुळे देवाण – घेवाण करणारे मोबाइलचा वापर करीत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
तीन महिन्यात ४३४ कोटींचे अमली पदार्थ जप्त
एप्रिलमध्ये वसईमधील कामण येथे ८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास करून म्हैसूर येथून ३८१ कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईत ४४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एकाच गुन्ह्यात तीन महिन्यांत तब्बल ४३४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.