मुंबई : मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) प्रसिद्ध केलेली पदभरतीची जाहिरात आरक्षणाबाबतच्या तरतुदींमधील संदिग्धतेमुळे रद्द करण्यात आली तरी अर्जदार विद्यार्थ्यांना मात्र हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. जुन्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांना मोठा दिलासा! डॉक्टरांच्या मागणीला अखेर यश
एसएनडीटी विद्यापीठाने १४ डिसेंबर २०२३ रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे १ हजार रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये होते. विविध पदांसाठी जवळपास २ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र आरक्षणातील संदिग्धतेमुळे एसएनडीटी विद्यापीठाने ती जाहिरात रद्द केली. त्यानंतर नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून पदभरती प्रक्रियाही सुरू केली आहे. मात्र त्यावेळी जुन्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत नवीन शुल्क भरण्याची तरतूदही केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचे शुल्क वाया गेले आहे. जुन्या जाहिरातीनुसार भरलेले प्रवेश अर्ज शुल्क परत करावे, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> पालिकेचे अधिकारी बैठकीतच व्यस्त; निवडणूकीच्या तोंडावर मंत्र्यांच्या बैठकांचा सपाटा
‘पदभरतीची संपूर्ण जाहिरात नव्याने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वीची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. हा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदस्यांसमोर घेण्यात आला होता. पदभरतीच्या पूर्वीच्या जाहिरातीनुसार अर्ज भरलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल’, असे मुंबईतील ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर यांनी सांगितले. ‘एसएनडीटी विद्यापीठाने नवीन जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले आहेत. त्यामुळे आधीच्या जाहिरातीनुसार केलेले अर्ज रद्द झाले आहेत. त्या उमेदवारांचे शुल्क परत करावे अशी मागणी अभाविपने केली आहे. अर्जदारांचे शुल्क परत न केल्यास आंदोलन करण्यात येईल’, असे अभाविप कोंकण प्रांतमंत्री संकल्प फळदेसाई यांनी सांगितले.