मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा अवमान केल्याप्रकरणी विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित परिचारिकांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात भेट देऊन निवेदन देण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणूून कार्यरत असलेले राजेंद्र कदम (५८) ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांनी २८ ऑगस्ट रोजी आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले ‘देव आणि देवळांचा धर्म’, तसेच दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकांचे वाटप केले होते. मात्र त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. रुग्णालयातील परिचारिकांनी याबाबत कदम यांना कार्यालयात बोलावून जाब विचारला. कदम यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्या अंगावर पुस्तक फेकण्यात आले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

विविध आंबेडकरी सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी आग्रीपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन निवेदन दिले. संबंधित दोन महिला परिचारिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हे प्रकरण केवळ प्रबोधनकारांचे पुस्कक फेकण्यापुरते नाही. राजेंद्र कदम यांना जातीय द्वेषातून अपमान करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित परिचारिकांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या जया बनसोडे यांनी केली. यावेळी आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देव आणि देवळांचा धर्म’, तसेच दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तक भेट देण्यात आले. पोलिसांनी मात्र हे प्रकरण अदखलपात्र गुन्ह्याचे असल्याचे सांगितले. या परिचारिकांना निलंबित करावे, अशी मागणी निवृत्त कक्ष सहाय्यक राजेंद्र कदम यांनी केली.

दोन्ही पुस्तकांवर बंदी नाही

प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले ‘देव आणि देवळांचा धर्म’, तसेच दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकांवरून वाद झाला असला तरी या दोन्ही पुस्तकांवर बंदी नाही. ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली तेव्हा खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायालयात या प्रकरणाचा खटला लढला होता आणि तो जिंकला होता, असे सामाजिक कार्यकर्ते पैंगबर शेख यांनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.