मुंबई : म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाने सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे आणि शेळगी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अंसघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (शहरी) (पीएमएवाय) घरे बांधली आहेत. या गृहप्रकल्पातील १३४७ घरांचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून या घरांचे वितरण करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, १७ ऑगस्ट रोजी या घरांचे वितरण करण्यात येणार आहे. या १३४७ कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मजूर, कामगार, असंघटित कामगारांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून पीएमएवाय योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. यातील एक योजना दहिटणे आणि शेळगी येथे राबविण्यात येत आहे. सार्वजनिक – खाजगी भागिदारी तत्वावर परवडणाऱ्या दरातील गृहबांधणी या घटकातर्गत असंघटित कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी ५० इमारतींमध्ये ३२७ चौरस फुटांची १२०० स्वयंपूर्ण घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या गृहप्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ११२८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी या गृहप्रकल्पाअंतर्गत आठ इमारतींची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण २५२ घरे बांधण्याचे नियोजन आहे. अद्यापपर्यंत यापैकी २२० घरांचे काम पूर्ण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील हे दोन्ही प्रकल्प हरित पट्ट्यात राबविण्यात येत असल्याने जमीन स्वस्त दरात उपलब्ध झाली आहे. यामुळे सदनिकेच्या किंमतीत एक लाख रुपयांची बचत झाली आहे. असंघटित क्षेत्रातील ८११ बांधकाम मजुरांना कामगार विभागामार्फत २ लाख रुपये अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले आहे.

दरम्यान, या घरांच्या बांधणीसह येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारीही म्हाडाकडेच सरकारने सोपविली होती. त्यानुसार पुणे मंडळाकडून येथे पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहेत. सामुदायिक सभागृह, अंगणवाडी, सौरउर्जेवर चालणारे दिवे, खेळाचे मैदान, बाग, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधांचा यात समावेश आहे. सुमारे ३३.०८ कोटी रुपये खर्च करून या पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.

पुणे मंडळाच्या पीएमएवाय योजनेतील दहिटणे आणि शेळगी येथील एकूण १३४७ घरांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता या घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी वितरण केले जाणार असल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाकडून देण्यात आली. या घरांसाठीच्या लाभार्थींना केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ही बाबही कामगारांसाठी दिलासादायक ठरणार आहे.