मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. रुईयामध्ये शिकलेल्या प्रत्येकाचे लाडके पेडणेकर सर म्हणजेच मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंचा हा अल्पपरिचय…

> डॉक्टरेट झाल्यानंतर पेडणेकर यांनी अमेरिकेतील स्टीव्हन्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ग्रीन केमिस्ट्री विषयाचे शिक्षण घेतले आहे.

> मागील २८ वर्षांपासून पेडणेकर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत

> पेडणेकरांनी एक शिक्षक असण्याबरोबरच रिसर्च गाईड, अॅडमिनिस्ट्रेशन, रिसोर्स पर्सन म्हणून अनेक सरकारी तसेच बिगर सरकारी संशोधन प्रकल्पांमध्ये संशोधक म्हणून काम पाहिले आहे.

> २०१२ साली महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम शिक्षक हा पुरस्कार मिळाला.

> नुकताच त्यांना रसायनशास्त्राचे सर्वोत्तम शिक्षक हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

> पेडणेकर मुख्याध्यापक झाल्यानंतर रुईया कॉलेजने नॅक अॅक्रीडेशनमध्ये ए ग्रेड मिळवली. विशेष म्हणजे ३.६५ सीजीपीए गुणांसहीत त्यांनी ही ग्रेड मिळवली. नॅक अॅक्रीडेशनमध्ये महाराष्ट्रातील वाणिज्य आणि कला शाखेतील कोणत्याही कॉलेजला मिळालेले हे सर्वोत्तम गुण आहेत.

> पेडणेकरांच्या नेतृत्वाखालीच कॉलेजला अनेक सन्मान मिळाले त्यापैकी
महत्वाचे सन्मान खालील प्रमाणे…
मुंबई विद्यापीठाकडून बेस्ट कॉलेजचा पुरस्कार (२००७-२००८)
— युजीसीकडून कॉलेज विथ पोटेंशियल फॉर एक्सेलन्स
— डिपार्टमेन्ट ऑफ बायोटेक्नोलॉजीकडून स्टार कॉलेज स्कीमचा पुरस्कार.
— भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून कॉलेजमधील सोयी सुविधांसाठी विशेष निधी कॉलेजला देण्यात आला

> पेडणेकरांच्या नेतृत्वाखाली रुईयाने खेळांमध्ये मागील आठ वर्षांपासून पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे

> मागील सात वर्षांपासून अनेक सांस्कृतिक स्पर्धांमध्येही कॉलेजने अव्वल क्रमांक कायम राखला आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मुंबई विद्यापीठातील ६७० कॉलेजेसपैकी खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रात कॉलेज पहिल्या क्रमांकावर आहे.

> पेडणेकरांनी रुईयामध्ये अनेक महत्वाचे बदल घडवून आणले. यामध्ये रचनात्मक बदल तसेच कॉलेजमधील सुविधांमध्ये वाढ करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

> रुईयामध्ये पेडणेकरांनी १३ नवीन अभ्यासक्रम सुरु केले.

> आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘इच वन अॅडॉप्ट वन’ आणि स्लम स्टडी सेंटरसारख्या योजना सुरु करुन गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला.

> पेडणेकरांनी पीएचडी आणि एमएससीच्या एकूण २३ विद्यार्थ्यांसाठी रिसर्च गाईडची भूमिका बजावली.

> राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये पेडणेकरांचे ३३ शोधप्रबंध प्रकाशित झाले आहेत.

> आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये संशोधन प्रबंध सादर करण्यासाठी पेडणेकर अनेक देशांमध्ये शैक्षणिक दौऱ्यासाठी जाऊन आले आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, कॅनडा, जर्मनी, बेल्जीयम, फ्रान्स, नेदर्लण्ड्स, ऑस्ट्रीया, स्वित्झर्लँण्ड, मलेशिया, सिंगापूर, इटली, व्हिएतनाम, कंबोडिया, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इस्त्रायल, तुर्की या देशांचा समावेश आहे. त्यांनी अनेक परिषदांमध्ये सहभाग घेतला असून १५ परिषदांमध्ये आपले शोध प्रबंध सादर केले आहेत.

> राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक शिक्षण समित्यांमध्ये पेडणेकरांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने नियोजन आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), नॅशनल असेसमेन्ट अॅण्ड अॅक्रीडेशन काऊन्सील (नॅक), महाराष्ट्र सरकारच्या विविध शैक्षणिक समित्यांचा समावेश आहे.

> पेडणेकर हे देशातील अनेक व्यावसायिक संस्थांचे सदस्य आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंडियन केमिकल सोसायटी, कॅटलिसीस सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सायन्स काँग्रेस, सोसायटी फॉर बायोमटेरियल्स अॅण्ड आर्टिफिशीयल ऑर्गन्स इंडिया, इंडो अमेरिकन सोसायटी, इंडियन मर्चंटस चेंबर, इंडियन असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर, विजयन भारती मुंबई, रोट्रॅक्ट क्लब ऑफ मुलुंड (दक्षिण), फायन्स कमिटी ऑफ मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थांचा समावेश आहे.

(सर्व माहिती पेडणेकर सुहासवेब्स.कॉमवरून)