लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर विधी शाखा (दोन वर्षीय अभ्यासक्रम) तृतीय सत्र परीक्षेचा निकाल तब्बल ११० दिवसांनंतर जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आला होता. मात्र परीक्षेस उपस्थित राहूनही काही विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासन गांभीर्याने विचार कधी करणार?, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

‘मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्र परीक्षेचा निकाल तब्बल ११० दिवसांनंतर जाहीर केला. मात्र त्या निकालात माझा आणि अन्य काही विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांकच नमूद नव्हता. परिणामी परीक्षेस उपस्थित राहूनही अद्यापही माझा निकाल जाहीर झालेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सांगितल्याप्रमाणे आम्ही हजेरी अहवाल सादर केला, पत्रव्यवहारही केला. कलिना संकुलातील परीक्षा विभागात गेल्यानंतर कोणीही सकारात्मक प्रतिसाद देत नाही. तसेच रखडलेला निकाल कधी जाहीर करणार, याबाबतही कोणी स्पष्टपणे सांगत नाही. आता पुढील शैक्षणिक संधींना मुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, अशी खंत एका विद्यार्थिनीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

आणखी वाचा-शीव कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी

दरम्यान, ‘पदव्युत्तर विधि शाखेच्या तृतीय सत्र परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी बारकोड चुकीचा लिहिल्याने, बबल चुकीचे केल्याने किंवा आसन क्रमांक चुकीचा लिहिल्याने त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे उपस्थितीपत्रक विधि महाविद्यालयांकडून प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.