ध्वनिप्रदुषण करणाऱ्या मंडळांच्या मुसक्या बांधण्यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली असली तरी यंदाचा गोंविदा जल्लोषात साजरा करणार, अशी भूमीका घेत शिवसेनेने पोलिसांच्या भूमिकेला आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला जाईल, मात्र आवाजावरील बंधने शिथील करावीत, या मागणीसाठी शिवसेना नेते पोलीस आयुक्तांची भेट घेतील, अशी माहिती जिल्हा संपर्क नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतरही पोलिसांनी ऐकले नाहीत, तर जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा देत शिवसेनेने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
दहिहंडी, गणेशोत्सवादरम्यान ठाणे शहरात होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाला आवर बसावा यासाठी पोलिसांनी यंदा सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळले जावेत, असा आग्रह धरला आहे. यासाठी शहरातील ध्वनीवर्धक ठेकेदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून आखून दिलेल्या पातळीपेक्षा आवाज वाढला तर तात्काळ कारवाई करण्याची तंबी सह-पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी दिली आहे. ठाणे शिवसेनेने मात्र पोलिसांच्या या भूमीकेला आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याने यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दहिहंडी उत्सव साजरा करण्यासंबंधी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे आम्ही स्वागत करतो. तसेच या नियमांचे पालन करुनच उत्सव साजरा केला जाईल. मात्र, उत्सवातील जल्लोष कायम रहावा यासाठी आवाजावर घालण्यात आलेली बंधने शिथील करावीत, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही पोलीसांनी हरकत घेतली तर जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवाप्रमाणे दहिहंडी उत्सवही जल्लोषात साजरा केला जाईल. वाद्याशिवाय कोणताही ऊत्सव साजरा होऊ शकत नाही, त्याशिवाय आनंदही मिळत नाही. त्यामुळे ही मर्यादा शिथील करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे ते म्हणाले.
शिवसेनेत मतभेदांची हंडी
बालगोविंदांच्या मृत्यूचे कारण पुढे करत शिवसेनेचे ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहिहंडी ऊत्सवातील झगमगाटाला आवर घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला होता. या पाश्र्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ‘जल्लोष होणारच’, अशी भूमिका घेतल्याने ठाणे शिवसेनेत मतभेदांची हंडी उभी राहिल्याची चर्चा सुरु आहे. ‘सरनाईक यांनी सोमवारी मांडलेली भूमिका हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी घेतलेला निर्णय ठाण्यातील सर्व शिवसैनिकांसाठी लागू असेल. रवींद्र फाटक, राजन विचारे आणि टेंभी नाक्यावरील मोठी उत्सव मंडळे जल्लोषातच उत्सव साजरा करतील,’ अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.
महिला आक्रमक
आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी फोडणारच. यंदा आमचा विक्रम करण्याचा इरादा आहे. आयोजकांनी उंच दहीहंडी बांधली तर ती आम्ही नक्कीच फोडणार, असे विलेपार्ले स्पोर्टस् क्लबच्या गोविंदा पथकाच्या गीता झगडे यांनी स्पष्ट केले, तर दरवर्षीप्रमाणे पाच थरांची दहीहंडी फोडण्याचा निर्धार स्वस्तिक दहीकाला पथकाच्या आरती बारी यांनी व्यक्त केला.
र्निबधानंतरही ठाण्यात लहान मुलांची हंडी
ठाणे : दहिहंडी उत्सवांमध्ये बालगोविंदाच्या सहभागाविषयी उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट निर्देश देऊनही ठाण्यातील शिवाजी मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या विशेष मुलांच्या दहिहंडी उत्सवात चक्क तीन थरांची हंडी उभारण्यात आली. ही हंडी फोडण्यासाठी १२ वर्षांखालील विशेष मुलांना तिसऱ्या थरांपर्यंत चढवण्यात आले. गेली अनेक वर्ष विशेष मुलांसाठी हा उत्सव साजरा होत असला तरी यंदा न्यायालयाच्या निर्देशामुळे तो वादात सापडला आहे. या उत्सवासाठी ‘यलो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाची नायिका जलतरणपट्टू गौरी गाडगीळ उपस्थित होती.
गोविंदा विभागातच फिरेल
उंच दहीहंडी फोडल्यानंतर अथवा १८ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागानंतर कारवाई झाली तर काय करायचे, याबाबत समन्वय समितीने कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. आयोजकांनी दहीहंडी बांधलीच नाही, तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे मोठा खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. पूर्वीच्या परंपरेनुसार विभागात छोटय़ा दहीहंडय़ा फोडून उत्सव साजरा करावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया परळ येथील जय भारत सेवा संघाचे दीपक परब यांनी व्यक्त केली.