मुंबई : प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता ध्रुव कुमार उर्फ ध्रुव सरजा याच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्माता राघवेन्द्र हेगडे यांच्याकडून ‘द सोल्जर’ चित्रपटासाठी साडेतीन कोटी रुपये घेऊन कराराचे उल्लंघन केल्याचा सरजा याच्यावर आरोप आहे. यामुळे ९ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप हेगडे यांनी केला आहे.

कांदिवली पश्चिम येथे वास्तव्यास असलेले तक्रारदार राघवेन्द्र हेगडे (५२) आर. एच. एन्टरटेनमेन्ट व आर-९ एन्टरटेनमेन्टचे मालक आहेत. त्यांनी २०१६ मध्ये ‘जग्गी दादा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता ध्रुव कुमार उर्फ ध्रुव सरजा त्यांना त्यांच्या अंधेरी येथील कार्यालयात भेटायला गेला होता. त्याने त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी ‘द सोल्जर’ चित्रपट काढायचे ठरवले. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी आर-९ एन्टरटेनमेन्ट आणि ध्रुव यांच्यात करार झाला.

सिनेमासाठी आगाऊ साडेतीन कोटी रुपये दिले

करार होण्यापूर्वी ध्रुव यांनी फ्लॅट खरेदीसाठी आगाऊ रकमेची मागणी केली. त्यानुसार हेगडे यांनी व्याजदराने पैसे उधार घेऊन जून २०१८ ते मार्च २०२१ या कालावधीत आठ हप्त्यांत एकूण ३ कोटी १५ लाख रुपये ध्रुव कुमारला दिले. याशिवाय, ध्रुव कुमारच्या विनंतीवरून चित्रपटाशी संबंधित आणखी ६ व्यक्तींना पैसे देले. व्यक्तींना पैसे देण्याची मागणी ध्रुव यांनी केली होती. त्यांनाही पैसे दिल्याचे हेगडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कराराचे उल्लंघन, चित्रपटास नकार

करारानुसार ध्रुव यांनी २०२० मध्ये चित्रीकरण व प्रमोशनसाठी ८० दिवस देणे, तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र ध्रुव यांनी चित्रीकरण सुरू करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. दरम्यान, करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे चित्रपट आणखी लांबला. टाळेबंदीनंतर ध्रुव यांनी कथितपणे हेगडे यांना टाळणे सुरू केले. हेगडे त्याला भेटण्यासाठी बेंगळुरूला गेले असता ध्रुव यांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिला. ध्रुव यांनी २०२१ मध्ये चित्रपटात काम करू शकणार नसल्याचे सांगितले.

९ कोटी रुपयांचा तोटा

ध्रुव कुमार यांनी करारचे उल्लंघन केले. सुरुवातीपासूनच त्यांचा फसवणूक करण्याचा उद्देश असल्याने त्यांनी संपर्क तोडला होता, असा आरोप हेगडे यांनी तक्रारीत केला आहे. ध्रुवकुमार यांनी ना चित्रपटावर काम केले, ना पैसे परत केले. ध्रुव कुमार यांना २०१८ मध्ये साडेतीन कोटी रुपये दिले होते. तेव्हापासून त्याच्या व्याजासह ९ कोटी ५८ लाख रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप हेगडे यांनी तक्रारीत केला आहे.

अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या फसवणुकीप्रकरणी हेगडे यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी ध्रुव यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) (फसवणूक) आणि ३१६ (२) (गुन्हेगारी विश्वासघात) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अभिनेता ध्रुव कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.