मुंबई : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मान्य केली आहे. आता ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

राज्यातील सोयाबीन खरेदीची मुदत ६ जानेवारीला संपली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला भाव मिळत नव्हता. हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी संपर्क साधून मुदतवाढीची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत केंद्राने ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून फडणवीस यांनी चौहान यांचे आभार मानले.

दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ‘अॅग्रो हब’, ‘मॅग्नेट’ प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व-सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ‘अॅग्रो हब’साठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>> आठवड्याभरात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात; कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ८२०० हेक्टर जमिनीचे संपादन

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

●पुढील वर्षापासून सोयाबीन खरेदीसाठीची तयारी, शेतकऱ्यांची नोंदणी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी

●सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावेत

●निकषांमध्ये सर्व सोयी-सुविधांचा अंतर्भाव असावा, अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहण्यासाठी यंत्रणा उभी करावी

●राज्यातील चारही विभागांसाठीच्या ‘अॅग्रो लॉजिस्टिक हब’चा प्रस्ताव सादर करावा

●कांदा चाळींची संख्या वाढवावी