दिवंगत व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्यावरील विशेषांक प्रकाशित
व्यंगचित्र नुसतं दिसायला आल्हाददायक, गोड असून उपयोगाचं नाही. त्यानं वाचकाला काही विचार दिला पाहिजे, त्यात चित्रकाराचं भाष्य असलं पाहिजे. व्यंगचित्रापासून मिळणारा आनंद बौद्धिक आनंद असतो. व्यंगचित्रकला ही संवेदनशीलता जागृत ठेवण्याचं साधन आहे.. व्यंगचित्रकलेविषयी अशी भूमिका घेणाऱ्या दिवंगत व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांना शब्दांजली वाहणारा ‘ललित’ मासिकाचा ‘वसंत सरवटे विशेषांक’ नुकताच प्रकाशित झाला आहे. सरवटे यांच्या व्यंगचित्रकलेचा, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध ललितच्या या विशेषांकातून (मे, २०१७) घेण्यात आला आहे.
उत्तम चित्रकार आणि व्यंगविषयाची प्रगल्भ जाण या दोन गुणांमुळे समकालीन व्यंगचित्रकारांपेक्षा निराळे ठरलेल्या वसंत सरवटे यांची कलाकीर्द बहुपेडी होती. व्यंगचित्रकलेला साहित्य आणि चित्रकला यांचा संगम मानणाऱ्या सरवटेंनी पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, विंदा करंदीकर अशा अनेक दिग्गजांच्या साहित्याला दृश्यसाज दिला. त्यांनी केलेल्या पुस्तक-नियतकालिकांची मुखपृष्ठे व आतील चित्रांनी मराठी वाचनविश्वाला एक प्रकारे चित्रसाक्षर केलं. एक विचारशील व्यंगचित्रकार, ग्रंथनिर्मितीच्या बाबतीत उत्तम संकल्पनकार आणि कलामाध्यमाचा तौलनिक विचार करणारे लेखक अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध प्रशांत कुलकर्णी व दीपक घारे यांनी संपादित केलेल्या या विशेषांकातून घेण्यात आला आहे. अंकात सुरुवातीलाच सरवटे यांच्या कन्या मंजिरी सरवटे व नातू निखिल प्रभू यांचे आठवणीपर लेख, तसेच सरवटे यांच्याबरोबर बालपणापासून असलेली मैत्ररेषा रेखाटणारा शि. द. फडणीस यांचा लेख, ‘वीणा’ मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा सरवटेंविषयीच्या आठवणी सांगणारा लेख या अंकात वाचायला मिळतात. सरवटे यांच्या चित्रांना जागतिक दर्जा कसा होता, हे सांगणारा ज्येष्ठ लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांचा लेखही या अंकात आहे. जागतिक चित्रकारांच्या पातळीची बुद्धिमत्ता व निरीक्षणशक्ती सरवटे यांच्या चित्रांतून जाणवत राहते, हे मतकरी यांनी लेखातून सांगितले आहे. याशिवाय मनोहर सप्रे, रामू रामनाथन, मुकुंद टाकसाळे यांनीही त्यांच्या लेखांतून सरवटेंचे शब्दचित्र रेखाटले आहे.
सरवटे यांच्या प्रवाही रेषेचे व त्यांच्या हास्यचित्रांची वैशिष्टय़े उलगडणारा प्रशांत कुलकर्णी यांचा लेख, तसेच ‘विचारवंत चित्रकार’ हा सरवटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू सांगणारा दीपक घारे यांचा लेख, शिवाय मधुकर धर्मापुरीकर, राजेंद्र मंत्री, सतीश भावसार, रविमुकुल यांच्या लेखांतून सरवटे यांच्या व्यंगचित्रवैशिष्टय़ांचा आलेख मांडला गेला आहे. याशिवाय विजय तेंडुलकर व बाळ सामंत यांनी घेतलेल्या सरवटे यांच्या मुलाखतीही अंकात आहेत.