मुंबई : गल्लीबोळातील कचऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला खडसावल्यानंतर आता स्वच्छतेबरोबरच पालिकेने अनधिकृत फलक हटविण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम घेण्याचे ठरवले आहे. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी यांनी सर्व अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. माझगांव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्र्यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता असल्याचे शुक्रवारी आढळले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संतापून पालिका आयुक्तांशी संपर्क साधला व मुंबईतील अंतर्गत रस्ते, गल्ली बोळ स्वच्छ करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. ‘मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसणार नाही, याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरीत हटवा’, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

त्यानंतर पालिका आयुक्तांनी बैठक घेऊन पालिकेतील सर्व अधिकारी, सहआयुक्त, उपआयुक्त, विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना शहरातील स्वच्छतेबाबत काही सूचना दिल्या. स्वच्छतेबरोबरच मुंबई महानगरात आढळणारे सर्व अनधिकृत फलक हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत फलकांचा मुद्दा पुन्हा गाजणार आहे.

हेही वाचा : खिचडी वितरण कथित गैरव्यवहार, आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

मुंबईत गणेशोत्सव जवळ आला असून याकाळात मंडळांना जाहिराती देणाऱ्या संस्था, राजकीय प्रतिनिधी यांचे फलक लावले जातात. मात्र आता या मोहिमेमुळे मंडळांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या फलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि धार्मिक फलकांचा समावेश असतो त्यामुळे करवाई खऱ्या अर्थाने आणि निःपक्षपातीपणे होणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.