मुंबईत आज (दि.२) तीनही रेल्वेमार्गांवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मुख्य लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बरच्या नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीममध्ये अप आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कालावधीत माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यानची डाऊन स्लोवरील वाहतूक सकाळी ११.२७ ते दुपारी ४.२७ पर्यंत डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

 

डाऊन स्लो मार्गावरील लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉक काळात अप फास्टवरील लोकल सकाळी ११.२२ ते दुपारी ३.२८ या वेळेत, तर डाऊन फास्ट मार्गावरील गाड्यांना सकाळी १०.४८ ते दुपारी २.५४ या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार असल्यामुळे या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉक काळात लोकल सकाळी ११ ते सांयकाळी ५ पर्यंत १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन फास्टवरील वाहतूक सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

 

हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊनवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बरवरील नेरुळ ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊनवरील वाहतूक सकाळी ११.०१ ते दुपारी ४.२६ पर्यंत बंद राहणार आहे. ट्रान्सहार्बरवरील ठाणे ते पनवेलची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी ११.०४ ते दुपारी ४.०४ पर्यंत नेरुळ ते पनवेलमध्ये बंद असणार आहे.

पनवेल ते अंधेरीमध्ये हार्बरची वाहतूकही बंद असेल. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळमध्ये विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत.