दिवाळीनिमित्त मुंबई महानगरातून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणात जाण्यासाठी खासगी बस, रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असतानाच एसटी महामंडळ मात्र याचे नियोजन करण्यातच गुंतले आहे. दिवाळी सुरू होण्यास अवघे दहा दिवस शिल्लक असतानाही महामंडळाने जादा गाड्या सोडण्याची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे महामंडळाचा मोठा नफा हातातून निसटण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- म्हाडाची सोडत अधिक पारदर्शक आणि सुरक्षित; संगणकीय प्रणालीत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी दिवाळीनिमित्त भाडेवाढ केली असून त्यामुळे नागपूर, कोल्हापूर, सातारा, सागली, औरंगाबादसह राज्यातील अन्य भागात जाणारा प्रवास महागला आहे. याशिवाय २० ऑक्टोबरपासून कोल्हापूर, सांगली, नागपूर, औंरंगाबाद आदी ठिकाणी जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस यासह अन्य गाड्यांना प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे खासगी प्रवासी बस गाड्यांचे तिकीट काढण्याशिवाय पर्याय प्रवाशांना राहिलेला नाही. त्यासाठी खासगी प्रवासी बस वाहतुकदारांकडे आरक्षणही होत आहे.

हेही वाचा- “एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री, अशा व्यक्तीच्या…”; संजय राऊतांच्या भावाची शिंदे गटासह फडणवीसांवर टीका

खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी गर्दीच्या काळातील बसगाड्यांचे नियोजन आधीच केले आहे. मग एसटी महामंडळ मात्र यात मागे का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. गणपती, दिवाळी तसेच आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्या जातात.

हेही वाचा- खासगी प्रवासी बस वाहतूदारांकडून वाहतूक नियम धाब्यावर; नाशिक बस आग दुर्घटनेनंतर ‘राज्यात विशेष बस तपासणी मोहीम’

गणेशोत्सवनिमित्त कोकणासाठी एसटी महामंडळाने यावेळी २,५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय २४ जून २०२२ ला जाहीर केला होता. या गाड्यांचे नियोजन करून त्या प्रवाशांना आरक्षणासाठी उपलब्ध केल्याने ३ हजार ४६६ जादा गाड्या आरक्षित झाल्या होत्या. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत मोठ्या उत्पन्नाची भर पडली होती. दिवाळीतही जादा गाड्यांचे नियोजन आधीच होणे गरजेचे असतानाच त्याला मात्र विलंब झाला आहे. आणखी तीन दिवस जादा गाड्याचे आरक्षण सुरू करण्यासाठी लागतील, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St corporation delays planning of extra trains for diwali mumbai print news dpj
First published on: 11-10-2022 at 13:00 IST