दिवाकर रावतेंकडून सहा घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून त्यांच्या नावाने सहा योजनांची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी केली. त्यामुळे एसटी आणि परिवहन विभागात शिवसेनेचा ठसा उमटविला जाणार असून ‘शिवशाही’ साकारण्यासाठी या योजना शनिवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले आहे.
परिवहन खाते शिवसेनेच्या रावते यांच्याकडे आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘कन्यादान’ योजना असून तिच्या नावाने १७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम एसटी बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवली जाईल. ही मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये मिळतील व या रकमेचा विनियोग विवाहासाठी होऊ शकेल. एसटी बसला अपघात होऊन प्रवासी मृत्यूमुखी पडला किंवा अपंगत्व आले, तर त्याच्या कुटुंबियांना किंवा त्याला मदत देण्यासाठी ‘अपंग सहायता निधी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. सध्या दिली जाणारी मदत तुटपुंजी असून याद्वारे अधिक मदत दिली जाईल. या योजनेत मृत प्रवाशाच्या वारसांना दहा लाख रुपये, कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला पाच लाख रुपये, अंशत विकलांग झालेल्या व्यक्तीला अडीच लाख रुपये आणि तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तीला एक लाख रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी लागणाऱ्या निधीसाठी प्रवाशांच्या प्रत्येक तिकीटावर एक रुपया नाममात्र अधिभार लावण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.
आलिशान शिवशाही बससेवा
एसटी प्रवाशांना आरामदायी सेवा देण्यासाठी शिवनेरी, अश्वमेध या बसच्या ताफ्याबरोबरच आता ‘शिवशाही’ ही बससेवा सुरु केली जाणार आहे. आलिशान सुविधा असलेल्या ५०० वातानुकूलित बसगाडय़ा त्यासाठी खरेदी करण्यात येत आहेत.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय
महामंडळाच्या एक लाख १० हजार कर्मचाऱ्यांसाठी पुणे येथील जागेत अतिविशेषोपचार रुग्णालय (सुपरस्पेशालिटी) उभारले जाईल. त्यामध्ये २५ टक्के जागा या महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी राखीव राहतील व त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. हे रुग्णालय १० वर्षे चालवून महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची अट ठेवली जाणार आहे.
निराधार स्वावलंबन योजना
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला स्वतच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी निराधार स्वावलंबन योजना जाहीर करण्यात आली असून त्यांना विशेष बाब म्हणून ऑटोरिक्षा परवाने दिले जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटीच्या १८ हजार बसगाडय़ा, २५० कार्यशाळा आदींसाठी ऑटोमोबाईल अभियंत्यांची आवश्यकता असते. त्यासाठी मोटारवाहन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले जाणार आहे. त्यात महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवल्या जातील.
महिलांना अबोली रिक्षा
नवीन रिक्षा परवान्यांसाठीच्या ऑनलाईन लॉटरीत महिलांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवले जाईल व त्यांच्या रिक्षांचा रंग अबोली राहील, अशी माहिती रावते यांनी दिली.
दुष्काळग्रस्तांना मदत
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले असून या रकमेचा सहा कोटी २३ लाख ३१ हजार ४८९ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St employees get facilities
First published on: 23-01-2016 at 00:08 IST