मुंबई : महागाई भत्ता आणि वेतनवाढीतील फरक रक्कम, दिवाळी भेट, सण उचल या मागण्यांचे फलक व क्रांतीची पेटती मशाल हातात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी ‘मशाल मोर्चा’ची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात आंंदोलन पुकारण्याचा निर्णय दादर येथील टिळक भवन सभागृहात सोमवारी घेतला. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती मध्यवर्ती कार्यालयावर १२ ऑक्टोबर रोजी ‘मशाल मोर्चा’ काढण्यात येईल. त्या दिवशी रात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होईल.
एसटी कामगारांना २०१६ सालापासून १,१०० कोटी रुपये महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नसून वेतनवाढ फरकाची २,३१८ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली नाही. याशिवाय १७ हजार रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून द्यावी. सण उचल म्हणून १२,५०० रुपये द्यावे आदी विविध मागण्या प्रलंबित असून वेगवेगळ्या प्रकारची एकूण थकीत रक्कम ४ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. यापोटी प्रत्येक कर्मचाऱ्याला सुमारे ३ लाख ७७ हजार रुपये मिळायला हवेत. ही रक्कम कधी देणार हे प्रशासनाने जाहीर करावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
एसटी कामगारांच्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा काढण्यात येणार असून तो १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजता काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे रूपांतर पुढे बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार आहे, असे बरगे यांनी सांगितले.
क्रांतीची मशाल हाती घेऊन, एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरलो आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक देणी जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे. एसटी कर्मचाऱ्याला कायम आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मशाल मोर्चा काढून एसटी प्रशासनाला झोपेतून जागे करायचे आहे. प्रशासन जागे झाले नाही, तर ऐन दिवाळीच्या तोंडावर ठिय्या आंदोलन केले जाईल. त्याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवाशांची मोठी गैरसोय होईल. अशी परिस्थिती ओढावून नये, असे प्रशासनाला वाटत असेल, तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तातडीने गांभीर्याने विचार करावा. श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस