मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी एसटीमधील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप तब्बल ५४ दिवस सुरू होता. त्यामुळे एसटी ठप्प झाली आणि राज्यातील दळण-वळण पुरते ठप्प झाले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनी करावे, घरभाडे, वार्षिक वेतनवाढ करावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

हेही वाचा >>> मुंबई: पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पेन्शन अदालतमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी; ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडली गाऱ्हाणी

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता देण्यात यावा, ही मागणीही करण्यात आली होती. त्यावेळी ४२ टक्के महागाई भत्ता देम्याचे आश्वासन देण्यात आले होते. अखेर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असून आता एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुधारीत वेतनश्रेणीसाठी गुरुवारी महागाई भत्त्याचा दर ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्याचे परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आले. असुधारित वेतनश्रेणीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२३ पासून महागाई भत्ताचा दर २१२ टक्क्यावरून २२१ टक्के लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ च्या वेतनात एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.