मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामातील महसूल वाढीच्या उद्देशाने दिवाळीत एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. परंतु, वाढत्या महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. तर, राज्यातील महापूराचा फटका बसलेल्या अनेक पूरग्रस्तांना बाहेरगावी जाण्यासाठी एसटीच्या दरवाढीला चटका सहन करावा लागणार आहे.
दिवाळीनिमित्त शहरातून गावी किंवा गावातून शहराकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासंधीचा लाभ घेत एसटी महामंडळ प्रत्येक प्रकारातील बससाठी १० टक्के तिकीट दरवाढ करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची एसटी दिवाळीत महाग होणार आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.एसटी महामंडळाच्या साधी, जलद, निमआराम, साधी शयनआसनी, साधी शयनयान, वातानुकूलित शिवशाही (आसनी), वातानुकूलित जनशिवनेरी (आसनी) या सर्व प्रकारातील बससाठी १० टक्के दरवाढ केली आहे. शिवनेरी आणि शिवाई या दोन बससाठी जुनेच तिकिटाचे दर असतील.
ज्या प्रवाशांचा १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवास सुरू होऊन, तो १४ ऑक्टोबर २०२५ ला किंवा त्यानंतर संपत आहे, अशा प्रवाशांकडून जुने आणि सुधारित प्रवास भाडे यातील फरकाची रक्कम वसूल करण्यात येणार नाही. दिवाळी गर्दीचा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून पुन्हा मूळ प्रति टप्पा दराने २५ जानेवारी २०२५ पासून लागू असलेल्या दराने भाडे आकारणी करण्यात यावी, असेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले.
सध्या सर्व आगारात ईटीआय मशीनद्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. ईटीआय मशीनमध्ये असलेल्या टप्पा आणि दरपत्रकामध्ये मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेडमार्फत आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात येतील. सर्व ईलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये सुधारीत दराप्रमाणे भाडे दरपत्रक कार्यान्वित झाले आहे याची खात्री करावी. त्याशिवाय मार्गावर ईटीआय मशीन देण्यात येऊ नयेत, अशा सूचना एसटी वाहकांना दिल्या आहेत.
मासिक, त्रैमासिक, विद्यार्थ्यांनी पासला दिवाळी परिवर्तनशील भाडेवाढ लागू करण्यात येणार नाही. इंधनदर, बसच्या सुट्ट्या भागाची वाढलेली रक्कम, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी दरवाढ लागू झाली होती. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या भाडे वाढीला मंजुरी दिली होती. त्यावेळी एसटीचे आगाऊ तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांकडून तिकीटाचा वाढीव दर वसूल करण्यासाठी, प्रत्येक थांब्यावर बस थांबवली गेली होती. त्यानंतर पुन्हा दिवाळीत भाडेवाढ करण्यात येणार असल्याने प्रवासी वर्गाद्वारे नाराजीचा सूर उमटत आहे.