मुंबई : फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या संकुलात सौर उर्जेवर आधारित चार स्मार्ट बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगेरीतील कुबे कंपनी आणि भारतातील रूट्स वर्ल्डवाईड यांच्या सहकार्याने ही आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या स्मार्ट बाकांचे उद्घाटन रूट्स वर्ल्डवाईडचे रे मार्टिन, हंगेरीचे राजदूत फेरेंक जरी, माजी खासदार राहुल शेवाळे आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आले.
स्मार्ट बाकांची आसन व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बाकांवर यूएसबी तसेच वायरलेस चार्जिंग यंत्रणा आणि इंटरनेट – वायफाय सुविधा आहे. तसेच एका छोट्या स्क्रीनच्या माध्यमातून दैनंदिन तापमान हवेची गुणवत्ताही समजणार आहे. ही बाकं कडाक्याच्या उन्हातही थंड राहून विद्यार्थ्यांना दिलासा देतील. या बाकांवर काचेचे आवरण आहे. हंगेरीतील ‘कुबे’ कंपनीने ही स्मार्ट बाकं आकर्षक पद्धतीने डिझाईन केली आहेत.
‘आम्ही यंदा ‘शाश्वत भविष्याचे संगोपन’ ही संकल्पना निवडली आहे. त्या अनुषंगाने आम्हाला स्मार्ट बाकं भेट म्हणून मिळणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. या बाकांचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल’, असा विश्वास सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या रेक्टर डॉ. कीथ डिसूझा यांनी व्यक्त केला.