मुंबई: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते गुरूवारी विधान भवनातच एकमेकांशी भिडले. दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या हाणामारीवर आता स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या अनागोंदी कारभाराची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ‘हम होंगे कामयाब’ या गाण्याशी हाणामारीचा व्हिडीओ जोडण्यात आला आहे. या व्हिडीओला त्याने ‘कायदा मोडणारे’ असे कॅप्शन दिले आहे.
व्हिडीओमध्ये वापरलेले गाणे हे कामराच्याच एका शोमधील आहे. याच व्हिडीओमध्ये कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार असे संबोधले होते. त्या व्हिडीओनंतर कामरा याला शिवसेनेच्या युवा शाखेच्या, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता.
महाराष्ट्र विधानसभेबाहेरील गोंधळ
गुरूवारी महाराष्ट्र विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यांनी एकमेकांचे कपडेही फाडले. विधान भवनाच्या परिसरात पहिल्यांदा अशाप्रकारची घटना घडल्याने कामरा याने पुन्हा एकदा त्याच्या कॉमेडी शैलीतून महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या हाणामारीनंतर आव्हाड यांनी असाही आरोप केला की, हाणामारीदरम्यान धमकी देण्यात आली आणि शिवीगाळही करण्यात आली.
“संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की हल्लेखोर कोण होता. आमच्याकडून वारंवार पुरावे मागितले जात आहेत. मात्र, संपूर्ण देशाने पाहिले आहे की हल्ला कोणी केला. गुंडांना विधानसभेत प्रवेश दिला जातो. यामुळे आमदारांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. मला शिवीगाळ करण्यात आली, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कुत्रा, डुक्कर असे अपशब्द वापरले गेले. विधानसभेत असे घडणे अपेक्षित होते का?” असे आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि माफी मागितली. “इथे जे घडले त्याबद्दल मला खरोखर दु:ख आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो”, असे ते म्हणाले.
शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, “जर गुंड विधानसभेत पोहोचत असतील तर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी त्याची जबाबदारी घ्यावी. हे अत्यंत दुर्दैवी आहे. विधानसभेत असे वर्तन योग्य नाही”.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या हाणामारीच्या घटनेचा निषेध केला आणि त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.