मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे बांधकाम वेगाने पूर्ण करा, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय सेवा जानेवारी २०२६ पर्यंत टप्प्याटप्याने सुरू करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्वसन प्रकल्पस्थळी भूषण गगराणी यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, अभियांत्रिकी विभागाचे संचालक गोविंद गारूळे, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव, इमारत परिरक्षण विभागाचे प्रमुख अभियंता मेहूल पेंटर, सिद्धार्थ रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. महारूद्र कुंभार उपस्थित होते.

हेही वाचा – अन्न सुरक्षेचा १०० दिवसांचा कृती आराखडा, अन्न व औषध प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती

हेही वाचा – मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयाच्या इमारतीचे पुढील बांधकाम वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे निर्देश गगराणी यांनी यावेळी संबंधितांना दिले. सिद्धार्थ नगर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाची ११ मजली इमारत उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. सुमारे ४८ हजार ५८८ चौरस मीटर क्षेत्रात इमारतीचे बांधकाम सुरू असून, आतापर्यंत इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमध्ये ३०६ खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. रुग्णालय इमारतीसह शवविच्छेदन केंद्र, निवासी डॉक्टरांसाठी इमारत, कर्मचारी वर्गासाठी इमारत आदी बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या कामाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे विभागांमार्फत मिळवण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पाचे काम ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. रुग्णालयातील सुविधांमध्ये विविध आजारांसाठीचे बाह्यरुग्ण विभाग, तसेच शस्त्रक्रिया विभाग, विविध चाचण्यांशी संबंधित निदानासाठी प्रगत प्रयोगशाळा समाविष्ट आहे. सुपर स्पेशालिटी अंतर्गत विविध आजारांसाठीचे निदान व उपचार सुविधाही पुरवण्यात येणार आहे.