पालिकेच्या ५ वर्षांच्या मोहिमेचे फलित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईतील भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या निर्बीजीकरण मोहिमेत पाच वर्षांत केवळ ५० टक्के श्वानांचेच निर्बीजीकरण शक्य झाले आहे. मुंबईत सुमारे अडीच लाखांहून अधिक भटके श्वान असून पाच वर्षांत नऊ कोटी खर्च केल्यानंतरही केवळ १ लाख २२ हजार श्वानांचेच निर्बीजीकरण होऊ शकले आहे. 

 भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पालिकेने प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम अर्थात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण किंवा नसबंदी करण्याचा कार्यक्रम १९९४ मध्ये हाती घेतला होता. मात्र विविध कारणांमुळे ही मोहीम रखडली. भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशानुसार वर्षांला ३० टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले तरच कुत्र्याची संख्या नियंत्रित राहू शकते. मुंबईतील कुत्र्यांची संख्या लक्षात घेता दरवर्षी ३२ हजार, तर दर महिन्याला ३६५ कुत्र्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत एक लाख २२ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी श्वान निर्बीजीकरणासंदर्भात पालिका प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

पालिकेने निर्बीजीकरणासाठी २०१८ पासून एकूण सात अशासकीय संस्थांची नेमणूक केली होती. मात्र २०२० पासून यापैकी एक संस्था बंद आहे. सध्या अिहसा, इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल, द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग, बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, उत्कर्ष स्टार मित्र मंडळ या सहा संस्थेची नेमणूक करण्यात आली. पालिकेकडे श्वान पकडण्यासाठी चार वाहने आहेत. तसेच परिमंडळ स्तरावर सात वाहने नेमली आहेत. त्यापैकी तीन वाहने कार्यरत आहेत. ही वाहने दोन पाळय़ांमध्ये कार्यरत आहेत. महानगरपालिकेच्या श्वान वाहनांवर ३८ कर्मचारी कार्यरत आहेत. तर २४ श्वान पारधी आहेत.

कोंडवाडे उभारण्याची मागणी

भटक्या श्वानांच्या उपद्रवाबाबत सातत्याने तक्रारी येत असतात. त्यातच त्यांचे निर्बीजीकरण संथगतीने सुरू असल्याने आता ही समस्या सोडवण्यासाठी मुंबईत कोंडवाडे उभारावेत, अशी मागणी नगरसेवक पडवळ यांनी केली आहे. 

पन्नास टक्के लक्ष्य

सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत २०१४ मध्ये भटक्या श्वानांची गणना करण्यात आली होती. त्या वेळी भटक्या श्वानांची संख्या अंदाजे ९५ हजार १७२ होती. त्यापैकी २५,९३५ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले नव्हते. त्यात १४,६७४ नर होते तर ११,२६१ मादी होत्या. निर्बीजीकरण न केलेली एक मादी चार पिल्लांना जन्म देते व ही पिल्ले वर्षभरात प्रजननक्षम होतात. श्वानांचा प्रजनन दर, मृत्यू दर व भटक्या श्वानांची निर्बीजीकरण संख्या लक्षात घेता सध्या अंदाजे दोन लाख ६४ हजार ६१९ भटके श्वान आहेत. मात्र त्यापैकी एक लाख २२ हजार ६४७ श्वानांचे निर्बीजीकरण झालेले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sterilization half dogs municipality campaign ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST