मुंबई : देशात आज ४० पटीने अधिक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्याला सरकारच्या योजना, धोरणे आणि सत्ताधाऱ्यांचे कर्तृत्व कारणीभूत आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. देशाला जगात गौरवाचे स्थान लाभावे, अशी वृत्ती समाजात गेल्या ४० वर्षांत मूळ धरत असून ती वाढविण्याची गरज आहे. देश आज खंबीरपणे उभा राहात असला, तरी तो अधिक सामथ्र्यसंपन्न झाला पाहिजे.
भारतीयांनी जगाला संवेदना, माणुसकी व करुणेची देणगी दिली पाहिजे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले. शिंपोली येथे सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या धनकुंवरबेन बाबूभाई धकाण रुग्णालय आणि रमाबेन प्रवीणभाई धकाण हृदयरोग केंद्र चा लोकार्पण सोहळा सरसंघचालकांच्या हस्ते पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सामाजिक दृष्टिकोनावर भाष्य करताना भागवत म्हणाले, आपल्याला समाजात नकारात्मक चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळतात. तो दृष्टीचा परिणाम असतो. मात्र देशात ४० पटीने अधिक चांगल्या गोष्टी घडत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या योजना व ध्येय धोरणांमुळे ते साध्य झाले आहे. काही लोक काहीच करीत नसल्यामुळेही ते साधता आले. त्यांना काही केले असते, तर गडबड झाली असती. भारतीयांची आज समाजाकडे आणि राष्ट्रहिताकडे बघण्याची वृत्ती बदललेली आहे. गेल्या चाळीस वर्षांत झालेला हा बदल आता उठून दिसत आहे. आता आपल्याला ध्येयपूर्तीसाठी एका दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे.
सुवर्णा धर्मादाय संस्थेच्या कार्याचे कौतुक करून समर्पण भावनेतून समाजाची सेवा करणारी ही रुग्णालये आधुनिक तीर्थस्थाने आहेत, असे गौरवोद्गार भागवत यांनी काढले. फडणवीस यांनीही रुग्णालयाचे विश्वस्त आमदार योगेश सागर आणि संबंधितांच्या कार्याचे कौतुक केले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील वनवासींना या ठिकाणी उपचार घेता येणार आहेत. त्यांची ने-आण करण्याची जबाबदारीही संस्थेने घेतली आहे. त्यामुळे वनवासी बांधवांबरोबरच सर्वसामान्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. कार्यक्रमास बाबुभाई धकाण, भूपेश धकाण, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, ज्येष्ठ स्वयंसेवक बिमल केडिया आदी मान्यवर उपस्थित होते.