मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्यातील कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून कामगारांच्या समस्यांची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप द म्युनिसिपल युनियनने केला आहे. वरळीतील अभियांत्रिकी संकुलात संतप्त कामगारांनी नुकतीच निदर्शने करत विविध मागण्या केल्या. विविध संवर्गाची रिक्त व पदोन्नतीची पदे तातडीने भरावीत, समान कामाला समान वेतन द्यावे, कामगारांना घाणकाम भत्ता द्यावा आदी विविध मागण्या कामगारांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास १ नोव्हेंबर रोजी संप करण्याचा निर्णय कामगारांनी केला आहे.

सफाई आणि परिवहन खात्यातील कंत्राटीकरणाविरोधात स्वच्छता कामगारांनी दिलेल्या यशस्वी लढ्यानंतर आता पाणी खात्यातील कामगारही विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. पाणी खात्यातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. खात्यातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे कामगारांवर कामाचा ताण येत आहे. तसेच, अनेकांना पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी द म्युनिसिपल युनियनने नुकतेच वरळीतील पालिकेच्या अभियांत्रिकी संकुलात निदर्शने केली.

विविध संवर्गाची रिक्त व पदोन्नतीची पदे तातडीने भरावीत, पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा फायदा देणे, सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देणे, कामगारांना घाणकाम भत्ता द्यावा, मानीव कायमत्व व गोपनीय अहवालाची प्रत, प्रतवारी कामगारांना देणे, समान कामाला समान वेतन द्यावे, कामगारांना कर्तव्यसूची देणे, अतिकालीन भत्याचे योग्य पद्धतीने अधिदान करावे, चौकीवरून कामाच्या ठिकाणी ये – जा करण्यासाठी वाहन उपलब्ध करावे आदी विविध मागण्या पाणी खात्यातील कामगारांनी केल्या.चौक्यांची पुर्नबांधणी करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचीही मागणी कामगारांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मागण्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे जल अभियंता यांनी मान्य केले आहे. जर ३१ ऑक्टोबरपर्यंत योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर १ नोव्हेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्यातील सर्व कामगार संपावर जातील, असा इशारा द म्युनिसिपल युनियनने दिला आहे.