मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातील मर्क्युरी अपार्टमेंटमध्ये पडलेल्या तब्बल ४० वर्षे जुन्या आंब्याच्या झाडाला स्थानिकांच्या प्रयत्नांतून जीवदान मिळाले. पर्यावरणप्रेमी संजिव वल्सन यांच्या पुढाकाराने आणि वाघोबा हॅबिटॅट फाउंडेशनच्या सहकार्याने ही वृक्षमोहीम पार पडली.

पावसामुळे मर्क्युरी अपार्टमेंटमध्ये गेल्या ४० वर्षांपासून असलेले झाडे मुळापासून कमकुवत झाले होते. याचबरोबर चुकीची वृक्ष छाटणी केल्यामुळे झाड एका बाजूला झुकले होते. कॉम्प्लेक्समधील काही सदस्यांनी याबाबत पालिकेकडेही तक्रार केली होती. दरम्यान, येथील सदस्यांनी याबाबत पर्यावरणप्रेमी संजीव वल्सन यांच्याशी संपर्क साधला.

वल्सन यांच्या पुढाकाराने, तसेच हॉर्टिकल्चरिस्ट विनोद मोहिते यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने झाडाची मूळे सुरक्षित ठेवून, योग्य आधार देऊन पुन्हा उभे करण्यात आले. विशेष म्हणजे, केईएस श्रॉफ कॉलेज, कांदिवली येथील विद्यार्थी स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रत्यक्ष झाड उभारणीच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची मौल्यवान शिकवणही मिळाली.

झाड उभे करण्याची प्रक्रिया काय ?

सुरुवातीला झाडांच्या मुळांना इजा होऊ नये यासाठी एक विशिष्ट प्रकारचे औषध वापरले जाते. हे औषध त्या मुळांवर मारण्यात येते. झाड वजनामुळे एका बाजूला झुकल्याने त्याची काही प्रमाणात छाटणी करण्यात आली. जेणेकरून झाडाला उो करण्यास मदत होते. याचबरोबर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात येतो. त्यानंतर ते झाड उभे करण्यात येते.

झाडाला दोरखंड किंवा लोखंडी आधारांच्या मदतीने हळूहळू सरळ उभे केले जाते.अचानक खेचल्यास मुळे तुटू शकतात. झाडाच्या खोडाला दोर, पट्टे किंवा लोखंडी पाइपचा आधार देण्यात येतो. हा आधार काही महिने झाडाला स्थिर ठेवतात, तोपर्यंत झाड पुन्हा मातीत घट्ट रुतून उभे राहते.

पावसामुळे मोठे झाड पडण्याची कारणे

  • पावसामुळे माती भिजते आणि मुळांना पकड कमी मिळते.
  • मुळाखालच्या मातीची धूप झाल्यास झाडाचे संतुलन ढासळते.
  • काही प्रजातींच्या झाडांची मुळे खोलवर जात नाहीत, ती वरवरच पसरतात. अशी झाडे मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे पटकन उन्मळून पडतात.
  • बांधकाम, खड्डे, जलवाहिन्या टाकणे अशा कामांमुळे झाडाच्या आजूबाजूची माती सैल होते.

पडलेले झाड लगेच तोडून टाकण्यात येते. पण योग्य नियोजन आणि काळजी घेतली तर झाडांना पुन्हा जीवनदान देता येते. या मोहिमेत अर्पाटमेंटमधील सदस्य, तज्ज्ञ आणि विद्यार्थी या सगळ्यांनी केलेली मदत पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहे. – संजीव वल्सन, पर्यावरणप्रेमी, सदस्य, सेव्ह आरे.