मुंबई : आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रिशन, फिटर व वेल्डर या अभ्यासक्रमाकडे अधिक असून, तीन फेऱ्यांमध्ये इलेक्ट्रिशन अभ्यासक्रमाला १६ हजार १२६ विद्यार्थ्यांनी, तर फिटर अभ्यासक्रमाला ९ हजार २२५ आणि वेल्डर अभ्यासक्रमाला ८ हजार २६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र त्याचवेळी जवळपास १० अभ्यासक्रमांना एकाही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.

राज्य सरकारकडून कौशल्य विकास अभ्यासक्रमाला प्राधान्य देण्यात येत असल्याने आयटीआय अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. आयटीआयमध्ये शिकविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांपैकी यंदा तिसऱ्या फेरीनंतर इलेक्ट्रिशन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. इलेक्ट्रिशनच्या २४ हजार ४४० जागांपैकी १६ हजार १२६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रवेश (३ हजार ९०३) हे नागपूर विभागातून तर सर्वात कमी प्रवेश (१ हजार ६६०) हे मुंबईतून झाले आहेत. इलेक्ट्रिशयनसाठी २ हजार २२८ महिलांनी प्रवेश घेतले आहेत. त्याखालोखाल विद्यार्थ्यांनी फिटर अभ्यासक्रमाला पसंती दिली आहे. फिटर अभ्यासक्रमाच्या १९ हजार ५०० जागांवर ९ हजार २२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून त्यात ३५१ मुलींनी प्रवेश घेतले आहेत.

फिटर अभ्यासक्रमासाठी नाशिकमधून सर्वाधिक, २ हजार १५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर अमरावती विभागातून सर्वात कमी, १ हजार ६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याचबरोबर वेल्डर या अभ्यासक्रमासाठी असलेल्या १६ हजार ८२० जागांवर ८ हजार २६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यात २३० मुलींनी प्रवेश घेतले आहेत. त्याचबरोबर कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंटसाठी ५ हजार ४६५, मेकॅनिक डिझेल या अभ्यासक्रमासाठी ४ हजार ७०६, वायरमनसाठी ४ हजार ३८३, मेकॅनिक मोटर व्हेईकल या अभ्यासक्रमासाठी ४ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

मुलींचा संगणक अभ्याक्रमाकडे कल अधिक

आयटीआयमध्ये मुलींसाठी ड्रेस मेकिंग, काॅस्मेटोलॉजी, फॅशन डिझाईन ॲण्ड टेक्नोलॉजी असे विविध अभ्यासक्रम असले तरी मुलींची सर्वाधिक पसंती ही कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट या अभ्यासक्रमाला आहे. या अभ्यासक्रमासाठी २ हजार १५३ मुलींनी प्रवेश घेतले आहेत. तर ड्रेस मेकिंगसाठी २ हजार ६, कॉस्मेटोलॉजी १ हजार ३८०, सुईंग टेक्नोलॉजीसाठी १ हजार १४३ आणि फॅशन डिझाईनसाठी अवघ्या ७८० मुलींनी प्रवेश घेतले आहेत.

एरोनॉटिक्सला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एरोनॉटिक्स हा अभ्यासक्रम नागपूर, नाशिक व पुणे या तीन आयटीआयमध्ये शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमाच्या एकूण ६० जागांपैकी तिसऱ्या फेरीनंतर ५० जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यात ४० मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. नागपूरमध्ये २० जागांपैकी १९ जागांवर प्रवेश झाले असून त्यात १२ मुले व सात मुली, नाशिकमध्ये २० जागांपैकी १७ जागांवर प्रवेश झाले असून, यामध्ये १५ मुले व दोन मुली आहेत. पुण्यातील २० जागांपैकी १४ जागांवर प्रवेश झाले असून, यामध्ये १३ मुले व एका मुलीचा समावेश आहे.