मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतून २२० विद्यार्थ्यांना बाद करण्यात आले आहे. यामध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या परराज्यातील १७० विद्यार्थ्यांबरोबरच प्रवेश प्रक्रियेदरम्यान एकही कागदपत्र अपलोड न केलेल्या ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुभा देऊनही त्यांनी ती सादर न केल्याने त्यांना तिसऱ्या फेरीतून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबरच त्यांच्यावर पुढील फेऱ्यांमध्ये बंदी घालण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.

परराज्यातील नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे आल्या होत्या. सीईटी कक्षाने या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर १७१ विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांची मूळ व अस्सल कागदपत्रे पुन्हा ऑनलाईन सादर करण्यास सांगितले. यातील फक्त एका विद्यार्थ्यांनी त्याची कागदपत्रे सादर केली. या विद्यार्थ्याच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. बाकी इतर १७० विद्यार्थ्यांनी कागदपत्रे ऑनलाईन सादर केली नाही. त्यामुळे या १७० विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या व त्यापुढील फेरीसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला.

त्याचप्रमाणे वैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज केलेल्या १०८ विद्यार्थ्यांनी त्यांची कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे सीईटी कक्षाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना नोटीस पाठवून त्यांची मूळ व अस्सल कागदपत्रे पुन्हा ऑनलाईन सादर करण्यास सांगितले. यातील ५८ विद्यार्थ्यांनी त्याची कागदपत्रे सादर केली. या ५८ विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. तर अन्य ५० विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला. त्यामुळे दोन्ही मिळून २२० विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या व त्यापुढील फेरीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली असून वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या यादीतून यांची नावे वगळण्यात आली आहेत.

वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी १७६४ रिक्त जागा

वैद्यकीय प्रवेशाच्या दुसऱ्या यादीनंतर राज्यात एमबीबीएसच्या ७८९ व बीडीएसच्या ९७५ मिळून १७६४ रिक्त जागा आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएससाठी १६८, तर बीडीएससाठी ६० जागा रिक्त आहेत. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएससाठी ६२१, तर बीडीएससाठी ९१५ जागा रिक्त आहेत. अशा एकूण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी १७६४ जागा राज्यात रिक्त आहेत. तिसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी निवड यादी ३० ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीमध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.