मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) या गटाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका २२ मेपासून संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. या उत्तरतालिकेबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी व हरकती नोंदविण्यासाठी २२ ते २४ मे पर्यंत संधी देण्यात येणार आहे. यामुळे चुकीचा प्रश्न किंवा पर्याय याबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार आहे.
एमएचटी सीईटी परीक्षा ही अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची समजली जाते. दरवर्षी पीसीएम आणि पीसीबी या दोन गटांमध्ये एमएचटी सीईटी परीक्षा होते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्रक्रियेबाबत पारदर्शकता यावी, यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नावर किंवा उत्तरतालिकेतील उत्तरावर आक्षेप असल्यास त्याबाबत हरकत नोंदविण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात येते. त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी गटातील प्रश्नपत्रिका व उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्याची संधी दिल्यानंतर आता पीसीएम गटातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी २२ ते २४ मे दरम्यान संधी देण्यात येणार आहे.
विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकतात. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व पर्यायांबाबत हरकती नोंदविता याव्यात यासाठी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ‘ऑब्जेक्शन ट्रॅकिंग’ हा पर्याय २२ ते २४ मेदरम्यान उपलब्ध करण्यात येणार आहे. हरकती नोंदविताना प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात पीसीबी गटाची परीक्षा कृषी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी ९ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून तीन लाख १ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली. तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल या दरम्यान झाली आणि यात चार लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली होती.
पीसीएम गटाच्या परीक्षेच्या अखेरच्या दिवशी, म्हणजेच २७ एप्रिल रोजी झालेल्या एका सत्रात जवळपास २५ प्रश्नांसाठी दिलेल्या उत्तरांचे पर्याय चुकीचे होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर सीईटी कक्षाने ५ मे रोजी या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी नव्याने परीक्षा घेतली. आता सीईटी कक्षाने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ मे रोजी पीसीएम गटाची उत्तरतालिका खुली केली होती. या उत्तरतालिकेतील उत्तरे पडताळून पाहण्यासाठी दोन दिवसांची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.