मुंबई : ‘आपण महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून गुरुपौर्णिमा साजरी करतो. व्यास नसते तर महाभारत घडले नसते आणि वाल्मिकी ऋषी नसते, तर रामायण घडले नसते. लेखकांचे महत्त्व हे भारतीय परंपरेतून दिसून येते. ज्याच्या कल्पनेतून सर्व उभे राहते, कथेचा विस्तार होतो, व्यक्तिरेखा साकारल्या जातात, एखादी गोष्ट काही हृदयांमधून लाखो हृदयांपर्यंत पोहोचते. तो लेखक हा सर्वश्रेष्ठच आहे. त्याच्यामुळे आम्ही आहोत’, अशी प्रांजळ कबुली ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी दिली.

मातब्बर कलाकारांचा अभिनय, सुमधूर संगीत आणि दर्जेदार सादरीकरणाने सजलेल्या श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत, नम्रता सिन्हा निर्मित आणि आलोक जैन दिग्दर्शित ‘सकाळ तर होऊ द्या’ या नवीन मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडला. याप्रसंगी चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक, गायक व संगीतकार रोहित राऊत, निर्माते व तंत्रज्ञ उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे ‘सकाळ तर होऊ द्या’ हा सुबोध भावे यांचा १०० वा चित्रपट आहे. तसेच ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाला रोहित राऊत यांनी संगीत दिले असून गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेली गीते हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली सादर करण्यात आली आहेत. तर ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी संवादलेखन केले आहे, तर छायांकन सुनील पटेल यांचे आहे. वितरणाची जबाबदारी सिनेपोलीसने सांभाळली आहे.

‘कोणत्याही चित्रपटात लेखकासह दिग्दर्शकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची कथा आणि दोन्ही पात्र ही प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी आहेत. मी दोन पात्र असलेली नाटके केली होती, आता दोन पात्र असलेला चित्रपट करताना वेगळा अनुभव घेतला’, असेही सुबोध भावे म्हणाले.

तर दिग्दर्शक आलोक जैन म्हणाले की, ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यानंतर मिळतील. या चित्रपटाच्या कथेवर काम करायला २० वर्षे लागली, यापैकी काही वर्षे निर्माते शोधण्यात गेली.

अनेक निर्मात्यांनी कथा वाचली आणि छान बोलून विषय सोडून दिला. पण श्रेय पिक्चर कंपनी व नम्रता सिन्हा यांना कथा आवडली आणि त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले, काहीही कमी पडू दिले नाही’.