Metro 4 Line Work Update मुंबई : ‘वडाळा – घाटकोपर – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या कामातील सर्व प्री कास्ट घटक बसविण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) पूर्ण केले आहेत. ‘मेट्रो ४’ मार्गिकेवरील शेवटची तुळई नुकतीच यशस्वीरित्या बसविण्यात आली. हे काम पूर्ण झाल्याने ‘मेट्रो ४’ मार्गिकेसह कासारवडवली – गायमूख मेट्रो ४ मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन – गायमूख या पहिल्या टप्प्याचे आतापर्यंत ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या १० ते १५ दिवसांत पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवर मेट्रो गाड्यांची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. तर डिसेंबरअखेरीस कॅडबरी जंक्शन – गायमूख टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल आणि ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होईल.

एमएमआरडीएने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकांमधील कॅडबरी जंक्शन – गायमूख दरम्यानचा १०.५ किमी लांबीचाचा आणि १० मेट्रो स्थानकांचा समावेश असलेला पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार १०.५ किमी लांबीच्या मार्गिकेच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या कामाअंतर्गत नुकतेच ‘मेट्रो ४’ मार्गिकेवरील शेवटची तुळई बसविण्याचे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. तर या मार्गिकेतील सर्व प्री कास्ट बसविण्याचेही काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील आव्हानात्मक काम पूर्ण झाले असून आता उर्वरित कामाला वेग देऊन ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील सर्व बांधकाम येत्या काही दिवसात पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तर दुसरीकडे कॅडबरी जंक्शन – गायमुख टप्प्यादरम्यान मेट्रो गाड्यांच्या चाचण्या घेण्यासाठीच्या पूर्वतयारीलाही एमएमआरडीएकडून वेग देण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यातील गाड्यांच्या चाचण्यांसाठी गाड्या उन्नत मार्गावर चढवून त्या स्थानकांपर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत. तर पहिल्या टप्प्यातील विद्युत वाहिन्या ३० ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. विद्युत वाहिन्या कार्यान्वित झाल्याने सोमवारी पहिल्यांदाच काही अंतरावर मेट्रो गाडी धावली. मेट्रो गाड्यांची चाचणी सुरू झाल्यास ठाण्यातील कॅडबरी जंक्शन – गायमुख दरम्यान १०.५ किमी मार्गिकेवर पहिल्यांदा मेट्रो गाडी धावणार असून ही ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरअखेरीस कॅडबरी जंक्शन – गायमुख टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.