मुंबई: श्वसनाचा त्रास होत असल्याने सतत प्राणवायूची गरज भासणाऱ्या २० महिन्यांच्या मुलीची तपासणी केल्यावर तिला कॉन्जेनिटल डायफ्रामॅटिक हर्निया (सीडीएच) हा दुर्मिळ आजार झाल्याचे आढळले. मुंबईतील एका रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या मुलीवर तातडीने यशस्वीरित्या उपचार करून डॉक्टरांनी तिला जीवदान दिले.

श्वसनाचा तीव्र त्रास होत असलेल्या आणि सतत प्राणवायूची गरज असलेल्या या मुलीला रुग्णवाहिकेतून मुंबईतील एका रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी बालरोग शस्त्रक्रिया विभगाचे सल्लागार डॉ. रसिक शाह यांच्या देखरेखीखाली सीटी अँजिओग्राफी आणि नियमित रक्त चाचण्यांसह अन्य चाचण्या त्वरित करण्यात आल्या. या मुलीवर यापूर्वी एका लहान रुग्णालयात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे या समस्येचे निराकरण झाले नसल्याने तिची प्रकृती अधिकच बिघडली होती.

यकृताच्या नसांचे किंकिंग आणि इनफिरियर व्हेना कावा (आयव्हीसी) यामुळे पोटात यकृत रिपोझिशन करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. त्यामुळे नसा पूर्ववत होण्यावर परिणाम झाला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये तिच्या यकृतापासून छातीच्या भागापर्यंत मोठा हर्निया झाला होता, यामुळे गुंतागूंत निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ वरिष्ठ सल्लागार डॉ. अशोक थोरात, क्रिटिकल केअर अँड इमर्जन्सी सर्विसेसचे मेडिकल डायरेक्टर व प्रमुख डॉ. सुनू उदानी, क्रिटिकल केअर मेडिसीनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अयोन सेनगुप्ता, बालरोग हृदय शस्त्रक्रिया वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रदीप कौशिक आणि भूलतज्ज्ञ डॉ. नंदिनी दवे यांनी बैठक घेऊन सविस्तर उपचार योजना आखली. यामध्ये यकृताचे विच्छेदन आणि डायफ्राम दुरुस्ती शक्य असलेल्या थोरॅको-ॲबडोमिनल दृष्टिकोनाचा वापर करून दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि डायफ्राम जाळीसह मजबूत करण्यात आला.

मुलीला जीवन रक्षक प्रणालीवर पेडिएट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (पीआयसीयू) हलवण्यात आले. एका आठवड्याने तिला जीवन रक्षक प्रणालीवर काढण्यात आले आणि पूर्ण आहार सुरू करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर दोन आठवडे तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. ४५ दिवसांनंतर तिचे वजन ६०० ग्रॅमनी वाढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातून गुंतागूंतीच्या पेडिएट्रिक स्थितींचे व्यवस्थापन करण्यामध्ये सहयोगात्मक, बहुआयामी केअरचे महत्त्व दिसून येते. उजव्या बाजूच्या डायफ्रामॅटिक हर्नियामध्ये यकृत काढून टाकण्याची आवश्यकता अत्यंत दुर्मिळ आहे. सायन्टिफिक मेडिकल लिटरेचरमध्ये अशा प्रकरणाची नोंद नसल्याचे नारायणा हेल्थ एसआरआरसी चिल्ड्रन्स रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. रसिक शाह यांनी सांगितले.