लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन (३२) यांनी बुधवारी पोलीस कोठडीत आत्महत्या केली. गेल्या नऊ महिन्यांत मुंबईत कोठडीत आरोपीने आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.

पंजाबमधून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात अटक केलेल्या अनुज थापन (३२) याने बुधवारी सकाळी मुंबई पोलीस मुख्यालयात असलेल्या कोठठच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर १४ एप्रिल रोजी पाच गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना पिस्तुल पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या कथित आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोठडीतील मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अधिक तपास करणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : कर्णबधिरांसाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती

एखाद्या आरोपीने कोठडीत आत्महत्या केल्याची नऊ महिन्यातील ही तिसरी घडला आहे. तत्पूर्वी, ८ सप्टेंबर २०२३ रोजी, मरोळ (पवई) निवासी सोसायटीतील हाऊसकीपिंग कर्मचारी विक्रम अटवाल (४०) याने अंधेरीतील पोलीस कोठडीत कथितरित्या आत्महत्या केली होती. त्याच्यावर ३ सप्टेंबर रोजी हवाई सेविका असलेल्या तरूणीची मरोळ येथील सदनिकेत हत्या केल्याचा आरोप होता. अटवालनेही कोठडीतील शौचालयात गळफास घेतला होता. टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु त्याच्या गुन्ह्यामुळे त्याच्या कुटुंबाची बदनामी होऊ शकते, या चिंतेने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा-पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटवालच्या अत्महत्येपूर्वी साधारण दीड महिना आणखी एका हत्येच्या घटनेतील आरोपीने आत्महत्या केली होती. हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दीपक जाधव(२८) याने २८ जुलै रोजी बोरिवली येथे कोठडीत आत्महत्या केली होती. बोरिवली पश्चिमेतील रहिवासी असलेल्या जाधवला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी एका हत्येच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. बोरिवली पोलिसांनी त्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले होते आणि त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती. त्याला सामान्य पोलीस कोठडीतमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र पुन्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली होती. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकणातील आरोपींवर नुकताच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गोळीबारानंतर देशभरात खळबळ उडाल्यानंतर त्या प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येनंतर शहरातील पोलीस कोठडीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.