राज्य सरकारचा गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला राज्य मुख्य माहिती आयुक्तपदासाठीच्या सुयोग्य उमेदवाराचा शोध अखेर संपला असून निवृत्त मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी गुरुवारी राज्याचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली.
लोकायुक्त म.अ. टहलियानी यांनी मल्लिक यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर मल्लिक यांनी प्रभारी मुख्य माहिती आयुक्त ए. के. जैन यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.
माजी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याबरोबरच लोकांना विनासायास जास्तीत जास्त माहिती कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले होते.
एवढेच नव्हे तर विभागीय माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्यासाठी आणि जास्तीत जास्त माहिती संबंधित विभागाच्या संकेतस्थळावरून लोकांना उपलब्ध होण्यासाठी सातत्याने आग्रह धरला होता. मात्र मे २०१७ अखेरीस मुख्य माहिती आयुक्तपदावरून गायकवाड सेवानिवृत्त झाल्यापासून गेले वर्षभर सरकारला या पदासाठी सुयोग्य उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे लोकांनी मागणी करून आणि न्यायालयाने आदेश देऊनही सरकारने हे महत्त्वाचे पद रिक्त ठेवणेच पसंत केले होते.
त्यामुळे गेल्या वर्षभरात विविध माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्तांकडे सुमारे ३६ हजार अपिले प्रलंबित आहेत. अखेर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकारने माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक यांची या पदावर नियुक्ती केली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला.