मुंबई : गणेशोत्सवानिमित्त सन मराठी वाहिनीवर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि ‘अभंग रिपोस्ट’ची मैफिल रंगणार आहे. ‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ हा विशेष कार्यक्रम रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. परंपरेची गोडी व आधुनिकतेची झलक यांचा सुरेख संगम कार्यक्रमातून साधण्यात आला आहे. स्वरमग्न करणारी गाणी व अभंग आणि आणि कलाकारांच्या धमाल सादरीकरणामुळे प्रेक्षकांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.
‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’बद्दल सन मराठी वाहिनीवरील कलाकार भावना व्यक्त करताना म्हणाले की, ‘गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणे म्हणजे आमचे भाग्य आहे. यंदाचा हा गणेशोत्सव म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी ठरणार आहे’. तसेच युवा पिढीला अभंगांचे वेड लावणारा आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारा ‘अभंग रिपोस्ट’ या समूहातील युवा मंडळीही पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत नवीन शैलीत अभंग सादर करणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘सन मराठी’चे संपूर्ण कुटुंब म्हणजेच लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ मंडळी एकत्र येत जल्लोषात श्रीगणेश आगमन करणार आहेत.
एकंदरीत प्रेक्षकांसाठी लाडक्या कलाकारांचे ठसकेबाज नृत्य, धमाल गाणी , पोटधरून हसवणारे खेळ अशी मनोरंजनाची भरगच्च मेजवानी असणार आहे. तरी भक्तीभाव आणि कलात्मकतेचा संगम असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांनी पाहण्याचे आवाहन ‘सन मराठी वाहिनी’ समूहाने केले आहे.