वर्षभरानंतरही पाच जिल्ह्यांतील ७६ ग्रामपंचायती पुरस्कारापासून वंचित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण चेहरा अशी ओळख असलेले आणि ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून या पक्षाला गावा- गावात पोहचविणारे माजी मंत्री आर.आर. पाटील यांच्या नावाने चालणाऱ्या सुंदर गाव योजनेला निधीटंचाईच्या झळा बसल्या आहेत. या स्पर्धेत पुरस्कारप्राप्त ठरलेल्या पाच जिल्ह्यांतील ७६ ग्रामपंचायतींना वर्षभरानंतरही बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.

 वित्त आणि ग्रामविकास हे दोन्ही विभाग राष्ट्रवादीकडे असतानाही त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या नावाने चालणाऱ्या योजनेचा बोजवारा उडाल्याची बाब समोर आलीआहे. राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण व पारदर्शकता तसेच तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध बाबींवर गुण दिले जाणार आहेत. त्यातून तालुका आणि जिल्हास्तरावर सुंदर ग्रामपंचायतींची निवड करण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी २०२० मध्ये या योजनेचे आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना असे नामकरण केले.

 या योजनेंतर्गत तालुका स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतीस १० लाख तर जिल्हा स्तरावरील ग्रामपंचायतीस  ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. या योजनेमध्ये सन २०१९-२०मध्ये तालुकास्तरावर ३५१ तर जिल्हा स्तरावर ३४ ग्रामपंचायती सुंदर गाव स्पर्धेत विजेत्या ठरल्या होत्या.गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या गावांना पारितोषिक देण्यासाठी ५५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र करोनामुळे आर्थिक र्निबध लागू करताना वित्त विभागाने या योजनेसाठी केवळ ५० टक्के म्हणजेच २७ कोटी ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यानुसार ग्रामविकास विभागाने ९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे २७ जिल्ह्यांतील तालुकास्तरावर विजेत्या ठरलेल्या २७५ ग्रापंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये या प्रमाणे ही रक्कम दिली असून उर्वरित ग्रामपंचायती अजूनही बक्षीस निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

या योजनेत विजेत्या ठरलेल्या ग्रामपंचायतींना वर्षभरानंतरही पुरस्काराची रक्कम मिळालेली नसल्याची कबुली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मुश्रीफ यांनी बीड जिल्ह्यातील गिरवली, सराटेवडगाव, ताडसोन्ना, किनगाव, केवड, शेरापुरी, तपोवन, रोहतवाडी, खोकरमोहा, बाहेगव्हाण या १० ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर तर धारूर तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतीला तालुका आणि जिल्हा स्तरावर या योजनेत सुंदर गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे मात्र अद्याप बक्षिसाचे पैसे देण्यात आलेले नसल्याचे मान्य केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sundar gaon yojana dire funds deprived gram panchayat awards districts amy
First published on: 21-03-2022 at 00:54 IST