मुंबई : मराठी- अमराठी वादाप्रकरणी उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. उच्च न्यायालयात याचिका करण्याचे आदेश दिल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी ही याचिका केली आहे.

द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करून भारतीय निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ अंतर्गत मनसेची मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्याची प्रमुख मागणी शुक्ला यांनी याचिकेद्वारे केली आहे. याशिवाय, ठाकरे यांच्याकडून केली जाणारी द्वेषपूर्ण भाषणे, त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही शुक्ला याचिकेत केली आहे. तसेच, याचिका निकाली निघेपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून ठाकरे यांना प्रक्षोभक, द्वेषपूर्ण भाषणे करण्यापासून मज्जाव करावा, असे आदेश देखील याचिकेत करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, शुक्ला यांनी या मागण्यांसाठी आधी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये मनसे आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित सुमारे ३० व्यक्तींनी आपल्या कार्यालय परिसरात घुसून मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर, आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मनसे कार्यकर्त्यांकडून अनेकदा धमक्यांचे फोन आले. हिंदी भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कारवाईची मागणी करणारी लेखी तक्रार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करूनही राज ठाकरे यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात धाव घेत असल्याचे याचिकेत म्हटले होते. तथापि, याबाबत उच्च न्यायालयात दाद का मागितली नाही ? मुंबई उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का ? अशी विचारणा सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने शुक्ला यांना केली होती. तसेच, याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची आणि उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

प्रकरण काय ?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून मनसे – भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्रित मुंबईत मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यावरून अमराठी भाषिकांना इशारा दिला होता. व्यापाऱ्यांना मराठी भाषा कशी येत नाही ? असा प्रश्ना केला होता व महाराष्ट्रात राहता, तर मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला होता.